अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी सायंकाळी उशीरापर्यंत जाहीर न झाल्यामुळे प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांमध्ये बुधवारी गोंधळाचे वातावरण होते. ही यादी सकाळी ११ वाजता ऑनलाइन जाहीर होणे अपेक्षित होत़े इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे की नाही हे पाहण्यासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे हजारो प्रवेशेच्छुक विद्यार्थी दिवसभर तंत्रशिक्षण संचालनालयाच्या http://dte.org.in/ या संकेतस्थळाला भेट देत होते. मात्र, यादी जाहीर न झाल्याने त्यांच्या पदरी निराशा येत होती.
सायंकाळी पाच वाजता यादी जाहीर करू, अशी माहिती दुपारी संकेतस्थळावर येऊ लागली. मात्र, सायंकाळी उशीरापर्यंत यादी जाहीर करण्यात आली नव्हती.
पहिल्या यादीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २९ जूनपर्यंत संबंधित महाविद्यालयात शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यांनी दिलेल्या १०० पसंतीक्रमांपैकी पहिल्या तीन पसंतीक्रमांकाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यास तो स्वीकारणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे. न स्वीकारल्यास ते विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाद होतील. उर्वरित विद्यार्थ्यांना मात्र बेटरमेंटसाठी दुसऱ्या फेरीत सहभागी होता येईल. त्यांना २ ते ४ जुलैदरम्यान पसंतीक्रम भरायचे आहेत. त्यासाठी रिक्त जागांची माहिती १ जुलैला संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांची दुसरी जागावाटपाची यादी ६ जुलैला जाहीर केली जाणार आहे.
वसंतदादामुळे विलंब
‘वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालया’चे नाव ‘केंद्रीय प्रवेश प्रक्रिये’तून (कॅप) वगळल्यानेच यादी जाहीर करण्यास विलंब होत आहे, असे स्पष्टीकरण संचालनालयाच्या वतीने देण्यात आले. आधी या महाविद्यालयाचे नाव कॅपमध्ये समाविष्ट होते. मात्र, २० जूनला एआयसीटीईने या महाविद्यालयाची मान्यता काढल्याने संचालनालयाने २३ जूनला या महाविद्यालयाचे नाव प्रवेश प्रक्रियेतून वगळले. या महाविद्यालयासाठी काही विद्यार्थ्यांनी पसंती दिल्याची शक्यता आहे. त्यामुळेच, हा विलंब झाल्याचे संचालनालयाचे म्हणणे आहे.