पाठय़पुस्तकांमधील चुका टाळण्यासाठी अभ्यास मंडळांनी प्रथम मसुदा तयार करून तो बेवसाइट व अन्य माध्यमातून जाहीर करून त्यावर सूचना व हरकती मागविण्याचे शालेय शिक्षण विभागाने ठरविले आहे. मंडळ सदस्यांवरील कारवाई कुचकामी ठरत असल्याने पाठय़पुस्तक निर्दोष करून नंतर छपाईला पाठविण्याचा मार्ग पुढील वर्षीपासून अंमलात आणण्यात येणार असल्याचे विभागातील सूत्रांनी सांगितले.
दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकातील भारताच्या नकाशात अरुणाचलचा समावेशच नव्हता. इतिहासाच्या पुस्तकात काही संदर्भ व नावांमध्ये चुका आहेत. नववीच्या भूगोलाच्या पुस्तकात अंदमान-निकोबारबाबत आणि हिंदीच्या पुस्तकात चुका आहेत.
 हे टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची उच्चस्तरीय बैठक नुकतीच झाली. चुकांची ओरड झाल्यावर अभ्यास मंडळातील सदस्यांवर कारवाई करून फारसे काहीच साध्य होत नाही. त्याऐवजी त्यांच्याकडून पुस्तकाचा मसुदा आल्यावर तो वेबसाइटवर जाहीर करण्यात यावा. काही मुख्याध्यापक, संबंधित विषयातील तज्ज्ञ आदींना तपासण्यासाठी देऊन सर्वाकडून आक्षेप किंवा हरकती मागविल्यास पुस्तकांमधील चुका टाळता येतील, यावर एकमत झाले आहे. ही पद्धत अवलंबिण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली असून पुढील पुस्तकांसाठी ती अंमलात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.