मुंबई विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या पदवी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास केलेल्या विलंबानंतर राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अद्यापि सुरू न केल्यामुळे विद्यार्थ्यांची फरफट होत आहे. दुर्देवाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील घोळ तसेच महाविद्यालयांच्या दर्जा व निकष पूर्ततेबाबत विद्यार्थी संघटना उदासीन असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हालांना कोणीच वाली नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.
अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त असल्या तरी संबधित विद्यार्थ्यांना ते राहत असलेल्या क्षेत्रात प्रवेश मिळत नाही म्हणून ते पदविकेचा (डिप्लोमा) पर्याय स्वीकारतात. पदविका मिळाल्यानंतर थेट अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांला प्रवेश मिळू शकतो. तथापि ही प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाने अद्यापि सुरू न केल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
 राज्यात पदविका अभियांत्रिकीच्या एक लाख ७४ हजार जागा असून मोठय़ा संख्याने विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांसाठी ऑनलाइन अर्जही केले आहेत. यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. ती अद्यापि जाहीर न झाल्याने प्रवेश कधी होणार, अभ्यास कधी करणार आणि परीक्षेच्या तोंडावर अभ्यास झाला नाही तर काय, ही चिंता विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.
याबाबत तंत्रशिक्षण संचालक सुभाष महाजन यांना विचारले असता, ‘विद्यापीठाने निकाल उशीरा लावल्यामुळे गुणवत्ता यादी तयार करण्यास वेळ लागला. मात्र येत्या दोन दिवसात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल’, असे त्यांनी सांगितले. मुदलात विद्यापीठाने परीक्षा वेळेवेर घेणे, निर्दोष पेपर काढणे आणि नियमानुसार ४५ दिवांसमध्ये निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे.
विद्यापीठात याबाबत आनंदीआनंद असून विद्यार्थी संघटनाही याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. निकालच वेळवर न लागल्यामुळे प्रवेशाच्या पुढील प्रक्रियांना दिरंगाई होऊन त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या करियवर होतो. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचीही अशीच फरफट सुरू असून आम्हाला वाली कोण हा या त्रस्त विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे.