‘सीसॅट’ (सिव्हील सव्‍‌र्हीसेस अ‍ॅप्टीटय़ूड टेस्ट) या २०० गुणांच्या संपूर्ण प्रश्नपत्रिकेवरच उमेदवारांचा आक्षेप होता. हा पेपर अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता ‘स्कोरिंग’ ठरत असून तो रद्द करावा किंवा त्याचे गुण मुख्य परीक्षेच्या निवडीकरिता गृहीत धरण्यात येऊ नये, अशी आंदोलक विद्यार्थ्यांची मुख्य मागणी होती. परंतु सरकारने केलेल्या बदलाने विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने ‘सी-सॅट’ची साठमारी सुरूच आहे.
प्रश्नपत्रिकेतील उताऱ्यांचे व प्रश्नांचे अनुवाद हिंदी बरोबरच इतरही प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून द्यावेत, अशी उमेदवारांची मागणी होती. हा वाद शांत करण्याकरिता केंद्राने या संदर्भातील घोषणा सोमवारी लोकसभेत केली. परंतु, आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांना हरताळ फासत केवळ दोन इंग्रजी उताऱ्यांचे २० गुण निवडीकरिता ग्राह्य़ धरले जाणार नाहीत, असा माफक दिलासा सरकारच्या वतीने कार्मिक विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी दिला. पूर्व परीक्षेमध्ये प्रत्येकी २०० गुणांचे सीसॅट एक आणि दोन असे पेपर द्यावे लागतात. त्यापैकी सीसॅट-२वर उमेदवारांचा विशेष आक्षेप आहे. यात इंग्रजी उताऱ्यांवरील प्रश्नांबरोबरच संभाषण कौशल्य, तर्काधिष्ठीत कारणमीमांसा (लॉजिकल रिझनिंग), विश्लेषण आणि निर्णय क्षमता, समस्यांचे निराकरण करण्याचे कौशल्य, सर्वसाधारण मानसिक क्षमता, प्राथमिक अंकज्ञान आदींचा कस पाहिला जातो. कॅट आणि जेईई या प्रवेश परीक्षांच्या निमित्ताने अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा या प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा सराव झालेला असतो. तसा अनुभव इतर शाखांच्या विद्यार्थ्यांना नसतो.

हिंदी भाषक विद्यार्थ्यांना हा पेपर किमान हिंदीतून तरी सोडविता येतो. पण, इतर भाषक विद्यार्थ्यांसमोर तर तोही पर्याय नसतो. त्यामुळे, किमान हा पेपर इंग्रजी-हिंदीबरोबरच मराठी, कन्नड सारख्या इतर प्रादेशिक भाषांमधून उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आहे. पण, या मागणीलाही हरताळ फासण्यात आला आहे. परिणामी शिवसेनेसारख्या पक्षांनी या मागणीकरिता आंदोलन करण्याची गरज आहे.
अजित पडवळ, लक्ष्य अकॅडमी