बारावीच्या सुधारित अभ्यासक्रमाचा फटका यंदाच्या अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या ‘एमटी-सीईटी’ या प्रवेश परीक्षेवरही झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत या परीक्षेत विद्यार्थ्यांची कामगिरी खालावली आहे. त्यामुळे, यंदा अभियांत्रिकी प्रवेशासाठीची कटऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत खाली येण्याची शक्यता आहे.
एमटी-सीईटी राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारलेली असते. या वर्षी बारावीचा अभ्यासक्रम सीबीएसईच्या समकक्ष आणण्यात आला. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना झेपणारा नसल्याने त्याच्या परिणाम यंदाचा विज्ञान शाखेचा निकाल खालावण्यात झाला. एमटी-सीईटीत याचीच पुनरावृत्ती झाली आहे. उदाहरणार्थ एमटी-सीईटीत पीसीएस गटात २०० पैकी १९० गुण मिळविणारे गेल्या वर्षी ३९ इतके विद्यार्थी होते. यंदा ते ३१ आहेत. त्याच पद्धतीने १८० ते १८९ दरम्यान गेल्या वर्षी २७५ इतके विद्यार्थी होते. यंदा हा आकडा २३२ वर आला आहे.
२०० पैकी १९७ गुणांची कमाई करण्याची केवळ मुंबईच्या जीत मेहता याने केली आहे. तर १९६ गुण मिळवून साताऱ्याच्या शची देशपांडे हिने दुसऱ्या क्रमांकाबरोबरच मुलींमध्ये अव्वल येण्याची कामगिरी केली आहे. त्यानंतर १९५ गुणांवर एकही विद्यार्थी नाही. हे असे कधीच होत नाही. त्या खालोखाल १९४ गुण मिळवून औरंगाबादचा नीरज पांडे तिसरा आला आहे. इतर मागासवर्गीयांमधून लातूरचा अनिकेत मार्लापल्ले १९३ गुण मिळवून पहिला आला आहे. तर अनुसूचित जातींमधून चंद्रपूरचा अमित वाघमारे १७९ गुण मिळवून पहिला आला आहे.
एकूण २ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी शून्य गुण मिळविणारे दोन विद्यार्थी सोडता सर्व विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. अभियांत्रिकीच्या १ लाख ५५ हजार ४६४ जागांचे प्रवेश या विद्यार्थ्यांमधून केले जाणार आहेत. तर औषधनिर्माण शास्त्राच्या १०, ५६५ जागांचे प्रवेश केले जाणार आहेत.

मुले-मुली प्रमाण
२०११
एकूण – २,५४,२०९
मुले – १,६४,६६९
मुली – ८९,५३९
२०१२
एकूण – २,८०,०४२
मुले – १,७९,९४३
मुली – १,००,०९९
२०१३
एकूण – २,८५,११२
मुले – १,७८,३९६
मुली – १,०६,७१६