परीक्षा काळात सदोष किंवा चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्याचे प्रकार थांबता थांबत नाहीत. सोमवारी आणि मंगळवारी पार पडलेल्या एलएलबी, एमएस्सी आणि बीकॉमच्या परीक्षेत याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली.
‘तृतीय वर्ष वाणिज्य शाखे’च्या (बीकॉम) ‘अकाऊंट आणि फायनान्स’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेत पेपर सेटरने गंभीर चूक करून ठेवल्याने हजारो विद्यार्थ्यांना मंगळवारी मनस्तापाला तोंड द्यावे लागले. मंगळवारीच झालेल्या एमएस्सीच्या (भाग१) प्राणीशास्त्र या विषयाच्या पेपर क्रमांक चारमध्ये दोन प्रश्नांची पुनरावृत्ती करून विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यात आले. तर सोमवारी ‘एलएलबी’च्या दुसऱ्या वर्षांत ‘क्रिमिनॉलॉजी’ या विषयाऐवजी ‘टॅक्सेशन’ची प्रश्नपत्रिका टेकवून विद्यापीठाने गोंधळ उडवून दिला.
बीकॉमच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना आठपैकी चार प्रश्न लिहायचे होते. त्यापैकी पहिला प्रश्न अनिवार्य होता. पण, या प्रश्नात पेपर सेटरने गंभीर चूक करून ठेवली होती. टॅलीवर आधारित हा प्रश्न चुकीचा असल्याने विद्यार्थ्यांना तो सोडविता आला नाही. प्रश्नातली चूक लक्षात आल्यानंतर परीक्षा विभागातून दूरध्वनीवर सूचना देऊन ती दुरूस्त करण्यात आली. मात्र, तोपर्यंत परीक्षेची वेळ संपत आली होती. प्रश्नपत्रिकेत चूक असल्याचे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता मधू नायर यांनी मान्य केले. चूक लक्षात आल्यानंतर आम्ही ती लगेचच सुधारली, असा दावा त्यांनी केला. पण, विद्यार्थ्यांचे म्हणणे वेगळे आहे. प्रश्नातील चूक दुरूस्त करेपर्यंत १२.५० झाले होते. पुढच्या १० मिनिटांत हा प्रश्न सोडविणे शक्य नसल्याने प्रश्न अध्र्यावर सोडून द्यावा लागला,अशी तक्रार एका विद्यार्थ्यांने केली.
पेपर सेटरच्या चुकीमुळे ३१ केंद्रांवर परीक्षेला बसलेल्या १० हजार विद्यार्थ्यांना यामुळे नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले. या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार, असा सवाल ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे गोरेगाव विभाग प्रमुख विक्रम राजपूत यांनी केला.
एमएस्सीच्या प्राणीशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील चूक तर फारच गंभीर होती. यात प्रश्न क्रमांक १ पुन्हा क्रमांक २ म्हणून सारख्याच गुणांसाठी विचारण्यात आला होता. तसेच प्रश्न क्रमांक ३ (ब) हा पुन्हा प्रश्न ५(ई) म्हणून विचारण्यात आला होता. फक्त ३(ब)मध्ये तो सहा तर ५(ई)मध्ये तीन गुणांसाठी विचारण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठाकडे या प्रकाराची तक्रार करूनही ती चूक दुरूस्त करण्यात आली नाही. त्यामुळे दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांचीही पुनरावृत्ती करण्याशिवाय विद्यार्थ्यांकडे पर्याय नव्हता.
एलएलबीच्या दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना तर वेगळ्याच गोंधळाला तोंड द्यावे लागले. क्रिमिनॉलॉजी आणि टॅक्सेशन अशा दोन एकमेकांना पर्यायी असलेल्या विषयाची परीक्षा सोमवारी झाली. पण, क्रिमिनॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना टॅक्सेशनची प्रश्नपत्रिका दिली गेली.
या संबंधात परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.