विविध कारणांमुळे  प्रवेश रद्द करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागा अन्य प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांमधून भरण्याऐवजी त्या रिक्तच ठेवण्याचे अनाकलनीय धोरण ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ने (एनआयटी) राबविल्याने देशातील ‘आयआयटी’खालोखाल प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या तंत्रशिक्षण संस्थेतील तब्बल ३२०० जागा यंदा चक्क वाया जाणार आहेत. थोडय़ाफार गुणांनी एनआयटीचा प्रवेश हुकलेल्या हजारो विद्यार्थ्यांवर यामुळे मोठा अन्याय होणार आहे. शिवाय जागा ‘अडवून’ ठेवण्याच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांकडून घेतलेले कोटय़वधी रुपयेही एनआयटीने परत करण्यास नकार दिल्याने प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होते आहे.

या वर्षी आयआयटी, एनआयटी, आयआयएफटी आणि जीएफटीआय या अग्रगण्य व नामांकित केंद्रीय तंत्रशिक्षण संस्थांच्या प्रवेशांमध्ये सुसूत्रता आणण्याकरिता एकत्रित प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. ‘जॉइंट सीट अ‍ॅलोकेशन अ‍ॅथॉरिटी’कडे या संस्थांच्या प्रवेशाची जबाबदारी होती. या समितीने प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून जागा ‘अडविण्याच्या’ (ब्लॉक) करण्याच्या नावाखाली ४५ हजार रुपये घेण्याचे ठरविले. यानुसार एकदा एखाद्या विद्यार्थ्यांने पैसे भरून जागा ‘अडविली’ आणि इतर चांगल्या संस्थेत वा अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्याने प्रवेशाच्या कोणत्याही टप्प्यावर माघार घेतली तरी ती जागा त्याच्या नावाने असल्याने रिक्तच राहणार आहे. म्हणजे प्रवेश रद्द करण्याची कोणतीच संधी ठेवण्यात आलेली नाही. हा नियमच  जागा यंदा मोठय़ा संख्येने रिक्त राहण्यास कारणीभूत ठरला आहे. ‘विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, पण त्यांनी तो निश्चित केला नाही अशा तब्बल ३,२०० जागा प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहिल्या आहेत,’ असे पाटणाच्या एनआयटीचे संचालक आणि ‘जॉइंट सीट अ‍ॅलोकेशन अ‍ॅथॉरिटी’चे को-चेअरमन अशोक डे यांनी सांगितले.
पैसे परत करण्याची मागणी
विद्यार्थी आता जागेवरील दावा सोडण्याच्या मोबदल्यात ४५ हजार रुपयांच्या परताव्याची मागणी एनआयटीकडे करीत आहेत. विद्यार्थ्यांनी जागा वाटप समितीला पत्रेही लिहिली आहेत. मात्र, या मागणीला समितीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
त्रांगडे नेमके कुठे?
यंदा चार प्रवेश फेऱ्या राबविल्या गेल्या. पहिल्या प्रवेश फेरीलाच विद्यार्थ्यांना जागांचा पसंतीक्रम द्यायचा होता. समजा दिलेल्या पसंतीक्रमापैकी एकाद्या जागेवर पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला तर त्याला ४५ हजार रुपये (ज्याचा परतावा त्याला मिळणार नाही आहे) भरून जागा ‘ब्लॉक’ करता येते आणि त्याला दुसऱ्या फेरीत बेटरमेंटकरिता जाता येते. परंतु, त्याने जागा ब्लॉक केली नाही तर तो प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडतो. त्यामुळे, साहजिकच बहुतांश विद्यार्थ्यांनी जागा ब्लॉक करण्याचा पर्याय निवडला. हजारो जागा ब्लॉक झाल्याने पुढील फेऱ्यांमध्ये बेटरमेंटची संधीही फारच थोडय़ा विद्यार्थ्यांना मिळाली.