शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेली तक्रार निवारण समिती आता शाळाबाह्य़ मुलांचीही दखल घेणार आहे. शाळाबाह्य़ मूल दिसल्यास विभागाच्या टोल फ्री मदत क्रमांकावर माहिती कळवण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

शिक्षकांच्या अडचणी, प्रवेशातील अडचणी यांबाबत तक्रारी करण्यासाठी शिक्षण विभागाने टोल फ्री क्रमांक सुरू केला होता. तक्रारींबरोबरच आता शाळाबाह्य़ मुलांची माहितीही या क्रमांकावर देता येणार आहे.
शाळाबाह्य़ मूल दिसल्यानंतर शिक्षण विभागाच्या मदत क्रमांकावर त्याची माहिती कळवायची आहे. मूल कोणत्या भागात दिसले याची माहिती त्या भागांतील शिक्षण अधिकाऱ्यांना किंवा जवळील शाळेला देण्यात येईल. त्यानंतर शाळाबाह्य़ मुलाची नोंद करून त्याला शाळेत आणण्याची जबाबदारी शाळेची आणि शिक्षण अधिकाऱ्यांची राहणार आहे. मुलाची नोंद केली का, ते शाळेत दाखल झाले का याची पडताळणीही करण्यात येणार आहे.