शाळांमध्ये आता ‘पॅकेज’ सहली नेणाऱ्या दलालांचा सुळसुळाट
विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वात, माहितीत भर टाकणाऱ्या शैक्षणिक सहलींऐवजी एखाद्या रिसॉर्ट अथवा तत्सम मनोरंजन पार्कात सहली नेण्याकडे शाळांचा कल वाढू लागल्याने आता अशा सहलींचे पॅकेज देणाऱ्या दलालांचाच या क्षेत्रात सुळसुळाट झाला आहे. पॅकेज सहलींमध्ये शाळा व्यवस्थापनावरील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला सहकुटुंब विशेष खानपान सेवेबरोबरच ‘व्हीआयपी’ वागणुकीची हमी असल्याने या दलालांना सध्या शाळाशाळांमध्ये चांगला भाव आहे. पण, शैक्षणिक सहलीमागील संकल्पनेचे मातेरे करणाऱ्या या प्रकारामुळे पालकांच्या खिशाला नसती तोशीस तर सहन करावी लागतेच, शिवाय यामुळे सहलींबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने केलेले नियमही अनेक शाळांकडून धाब्यावर बसविले जात आहेत.
डिसेंबर-जानेवारी महिना जवळ आला की, शाळाशाळांमधून शैक्षणिक सहलींचे वातावरण तयार होऊ लागते. आता या वातावरणात भर घालायला वेगवेगळ्या रिसॉर्ट आणि मनोरंजन पार्काच्या वतीने असे पॅकेज देणाऱ्या दलालांचा समावेश झाला आहे. यापैकी काही दलालांचे तर थेट शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे अनेकदा अमुकअमुक दलालाद्वारेच सहलीचे आयोजन करण्यासाठीचे शाळांवरील दडपणही वाढते. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ५०० रुपयांपासून सुरू होणारी ही पॅकेजेस पुढे रिसॉर्टच्या दर्जानुसार वाढत जातात. यात अमुक इतके विद्यार्थी असतील तर तमुक शिक्षकांचा किंवा कर्मचाऱ्यांचा (कधीकधी सहकुटुंबही) खर्च मोफत अशा प्रकरची प्रलोभने असल्याने शाळाही फशी पडतात. परंतु, ‘यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वात भर टाकण्याच्या दृष्टीने आखल्या केलेल्या शैक्षणिक सहल या उद्देशालाच हरताळ फासला जातो. परिणामी गेली काही वर्षे या सहलींना जाणेच आपण सोडून दिले आहे,’ अशी खंत गोरेगावमधील एका शाळेच्या संवेदनशील शिक्षकाने व्यक्त केली. या सहलींमध्ये विद्यार्थी-शिक्षकांमध्ये केल्या जाणाऱ्या भेदभावाबद्दलही काही संवेदनशील शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

नियमही धाब्यावर
सहलींच्या आयोजनामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुसूत्रता असावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने केलेल्या नियमावलीनुसार प्रत्येक शाळेने आपल्या सहलीबाबत शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी यांची मान्यता घेणे बंधनकारक आहे. परंतु फारच थोडय़ा शाळा ही तसदी घेतात.

निबंध तरी कसा लिहावा?
एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी किंवा शहरातल्याच शहरात महत्त्वाच्या व प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन विद्यार्थ्यांना घडवून बरेच काही साध्य करता येऊ शकेल, परंतु वेगळा विचार करण्याऐवजी शाळाही रिसॉर्ट अथवा मनोरंजन पार्कातील सहलींचा सहज उपलब्ध होणारा पर्याय निवडतात.
या एकसुरी अनुभवामुळे विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व बंदिस्त होऊन जाते. असे विद्यार्थी ‘माझा अविस्मरणीय प्रवास’ या विषयावर सुंदर निबंध लिहितील ही अपेक्षाच करणे चूक ठरते.
– राजेश पंडय़ा,
हिंदी विषयाचे शिक्षक

शिक्षक-पालक संघात ठरावे
शिक्षण हक्क कायद्यामुळे शाळेच्या शिक्षक-पालक संघाला अनेक अधिकार दिले आहेत. शैक्षणिक सहलीचा निर्णयही याच संघाने ठरविला तर अनेक प्रश्न सुटतील. परंतु, या विषयात शाळांना मार्गदर्शक सूचना देण्यापलिकडे आम्ही काही करू शकत नाही.
– बी. बी. चव्हाण,
शिक्षण उपनिरीक्षक, दक्षिण मुंबई</p>