व्याख्याता पदांकरिता डिसेंबर, २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय पात्रता परीक्षे’चा निकाल सहा महिने उलटूनही लागला नसल्याने ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
पुणे विद्यापीठातर्फे ही परीक्षा घेतली जाते. ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने (यूजीसी)ठरवून दिल्याप्रमाणे वर्षांकाठी जून आणि डिसेंबरमध्ये दोन वेळा या परीक्षेचे आयोजन केले जाते. मात्र, १ डिसेंबरला घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे, ही परीक्षा दिलेले लाखो विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
सेट परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असल्यामुळे परीक्षेचा निकाल महिनाभरात देखील जाहीर करता येणे शक्य आहे, अशी प्रतिक्रिया एका उमेदवाराने व्यक्त केली. यूजीसीतर्फे घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेचा निकाल दोन ते तीन महिन्यात जाहीर होतो. मग सेट परीक्षेच्या निकालाला इतका विलंब का, असा परीक्षार्थीचा प्रश्न आहे. निकाल जाहीर झाला नसल्यामुळे शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला विविध महाविद्यालयांमध्ये निघणाऱ्या व्याख्यात्याच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येत नाही, अशी प्रतिक्रिया एका उमेदवाराने व्यक्त केली.
दुदैवाने सेट परीक्षेची माहिती देणाऱ्या संकेतस्थळावरही निकालासंबंधी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांना दररोज संकेतस्थळ उघडून पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. संकेतस्थळावर दिलेल्या दोन्हीही दूरध्वनी क्रमांकांवरही कुणी उत्तर देत नाही.
जून महिन्यात होणाऱ्या पुढील सेट परीक्षेची तारीख एव्हाना जाहीर व्हायला हवी होती. परंतु, आधीच्याच परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.