देशातील शिक्षण व्यवस्थेचे अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या सद्य:स्थितीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. सोशल अँड रुरल रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या अहवालानुसार देशात ६ ते १३ वयोगटातील ६ लाख अपंग मुले अजूनही शिक्षणापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. राज्यात ही संख्या २२ हजार आहे. देशातील एकूण शाळाबाह्य़ मुलांचे प्रमाण गेल्या नऊ वर्षांत घटले असले, तरी अद्यापही ६० लाख विद्यार्थी शाळाबाह्य़ आहेत.
सर्व शिक्षा अभियान सुरू होऊन १३ वर्षे झाली आहेत. मात्र, अद्यापही सर्व घटकांतील मुलांना शाळेकडे वळवण्यात म्हणावे तसे यश मिळाले नसल्याचेच सिद्ध होत आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या परिणामांचा आढावा घेण्यासाठी दर तीन किंवा चार वर्षांनी सर्वेक्षण करण्यात येते. सोशल आणि रूरल इन्स्टिटय़ूटच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येते. तिसऱ्या सर्वेक्षणाचे अहवाल नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अपंग मुलांच्या शिक्षणाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे या सर्वेक्षणातून दिसत आहे. देशात ६ ते १३ वर्षे वयोगटातील साधारण २१ लाख ४० हजार अपंग मुले आहेत. त्यातील साधारण २८ टक्के म्हणजे ६ लाख मुले शाळाबाह्य़ आहे. राज्यातही अपंग विद्यार्थ्यांची स्थिती फारशी चांगली नाही. राज्यातील २२ हजार ५०० अपंग मुले (११.९० टक्के) ही शाळाबाह्य़ आहेत.या सर्वेक्षणानुसार एकुणात शाळाबाह्य़ मुलांचे प्रमाण घटले आहे. मात्र, तरीही अद्याप देशांत ६० लाख ४१ हजार मुले (२.९७ टक्के) शाळाबाह्य़ आहेत. २००६ च्या सर्वेक्षणानुसार ६.९४ टक्के आणि २००९ च्या सर्वेक्षणानुसार ४.२८ टक्के मुले शाळाबाह्य़ होती. राज्यातील १ लाख ४५ हजार मुले (०.८१ टक्के) मुले अद्यापही शाळाबाह्य़ आहेत. ग्रामीण भागांत हे प्रमाण जास्त आहे.
देशातील शाळाबाह्य़ अपंग विद्यार्थी
*मानसिक अपंग – १ लाख १२ हजार १७५ (३६ टक्के)
*अंध – ७३ हजार ९६९ (१७.६४ टक्के)
*कर्णबधिर – ४२ हजार ५५६ (१९.३१ टक्के)
*वाचादोष – १ लाख २६ हजार ३१९ (३४.८२ टक्के)
*अस्थिव्यंग – १ लाख २७ हजार ४८९ (२३. ७२ टक्के)
*एकापेक्षा अधिक प्रकारचे अपंगत्व – १ लाख ११ हजार ५६४