केळीच्या खोडापासून बनविलेला कागद.. बांबूचा वापर करून तयार केलेल्या कुबडय़ा.. हात धुतल्यानंतर वाया जाणाऱ्यापाण्यातून वृक्ष संवर्धन.. आग लागल्यावर मोबाइवर येणारा अलार्म.. थंड वारा आणि पाणी देणारे अनोखे यंत्र.. अशा एक ना अनेक वैज्ञानिक क्लुप्त्या वापरून पाच राज्यातील शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रयोग पाहण्याची अनोखी संधी मुंबईकरांना मिळणार आहे. निमित्त आहे ते वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात भरलेल्या २८व्या ‘पश्चिम भारत विज्ञान प्रदर्शना’चे.
महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा आणि छत्तीसगड या राज्यांत विजेत्या प्रयोगांना या प्रदर्शनात स्थान मिळाले आहेत. यात केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे तर शिक्षकांचेही प्रकल्प पाहवयास मिळणार आहेत. यावर्षी ३० विद्यार्थी आणि १५ शिक्षकांचे प्रयोग विज्ञान जत्रेत मांडण्यात आले आहेत. यामध्ये मुलभूत विज्ञानाच्या संकल्पना सांगणाऱ्या प्रयोगांबरोबरच पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता या विषयावरील प्रयोगांचाही समावेश आहे. या जत्रेचे उद्घाटन बुधवारी उर्जा आणि साधने संस्थेच्या संचालक डॉ. अंजली पारसनीस यांच्या हस्ते झाले. चार दिवस चालणाऱ्या या जत्रेची सांगता १९ डिसेंबर रोजी पारितोषिक वितरणाने होणार आहे. यावेळी मुंबईतील मुलभूत विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. आर. व्ही. होसूर उपस्थित राहणार आहेत.

शिवानीचा नवा प्रयोग
राजस्थानच्या शिवानी मुंद्रा या महाराणा मेवाड पब्लिक विद्यालयाच्या विद्यार्थीनीने केळीच्या खोडापासून उपयुक्त अशा कागदाची निर्मिती केली. केळीच्या खोडाला वाटून तो लगदा एका सपाट वस्तूवर पसवून त्याला उन्हात वाळवल्यानंतर त्यावर इस्त्री फिरवली असता कागद तयार होऊ शकतो व याचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने केल्याचे शिवानीने आपल्या प्रदर्शनात दाखवले. याच्यावर नक्षीकाम करून लोकांना शुभेच्छा पत्र म्हणून भेट देऊ शकतो, त्यावर छायाचित्र चिटकवले जाऊ शकतात, त्याच्या साहाय्याने खोकी तयार केली जाऊ शकतात, पुस्तक खूण, कापडी पिशवी अशा अनेक बनवता येतात. या नवनिर्मितीसाठी जास्त सामग्रीचा उपयोग केला गेला नाही हेच याचे यश आहे असे शिवानीचे म्हणणे आहे.

बहुउद्देशीय बांबूच्या कुबडय़ा
महाराष्ट्रातील कुडाळ तालुक्यातील मृण्मयी वालावलकर व मनाली पास्ते या दोन विद्यार्थीनींनी कोकणात बांबूची उपलब्धी जास्त असल्याने बांबूचा उपयोग करून बहुउद्देशीय बांबूच्या कुबडय़ांची निर्मिती केली. या कुबडय़ांचा अशा पद्धतीने बनवल्या आहेत की याचा उपयोग बसण्यासाठी खूर्ची वा कमोड म्हणून होऊ शकतो. त्याशिवाय कुबडय़ाच्या बांबूला पिण्याची बाटली अडकवण्यासाठी व कुबडय़ाच्या वरच्या बाजूला छत्री अडकवू शकतो याव्यतिरिक्त कुबडय़ांच्या बांबूवर बॅटरी, घंटा, रिफलेक्टर लावण्याची सोयही केली आहे. अपंगाच्या उंची नुसार ती कमी जास्त करता येते.