ठाणे शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान

नाशिक येथील घरातून पळून ठाण्यात आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना ठाणे शहर वाहतुक पोलीसांनी कुटूंबियांच्या स्वाधीन केले. घरच्यांना न सांगता इतक्या दुर आल्यामुळे पालक रागावतील या भितीने या मुलांनी ठाणे पोलीसांसमोर अपहरण झाल्याचा बनाव कथन केला. मात्र पोलीसांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन शहानिशा केल्यानंतर या मुलांनी अपहरणाचे नाटक रचल्याचे उघड झाले. या तीनही मुलांना त्यांच्या कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतुक शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी मंगळवारी दिली.

नाशिक येथील सातपूर अशोकनगर येथे राहणारे दोन भावंडे आणि त्यांचा एक मित्र असे तिघेजण घरच्यांना कोणत्याही माहिती न देतात घरातून पळाले. नाशिक येथून रेल्वेने त्यांनी ठाणे गाठले.

ठाण्यात पोहचले तेव्हा रात्र झाली होती. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. घरीपरत गेल्यास पालकांकडून शिक्षा केली जाण्याची भिती त्यांच्या मनात होती. त्यामुळे या मुलांनी अपहरण झाल्याचा बनवा रचला. रेल्वे स्थानकातील वाहतुक विभागाच्या चौकीमध्ये धावत येऊन वाचवा वाचवा असे ओरड सुरू केला. यावेळी या मुलांनी आम्हाला नाशिक म्हणून एका पांढऱ्या रंगाच्या गाडीतून तोंडाला रूमाल बांधून पळवून आणण्यात आल्याचे पोलीसांना सांगितले.

स्थानक परिसरातील आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ गाडी उभी असून तेथून पळून मदतीसाठी चौकीत आल्याचे त्यांनी सांगितले. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे अशी कोणतीच गाडी उभी नव्हती. येथील पोलीस कर्मचारी एस. एन. चौधरी यांनी मुख्य नियंत्रण कक्षात ही माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच वाहतुक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी घटनास्थळी भेट दिली. मुलांची विचारपूस केली. चौकशी करताना त्यांच्याकडे मोबाईल असल्याचे स्पष्ट झाले त्यावरून त्यांच्या पालकांशी संपर्क करून त्यांना ठाण्यात बोलवण्यात आले. त्यावेळी या मुलांनी घरच्यांना न सांगता आल्यामुळे घरचे रागवती म्हणून अपहरण झाल्याचा खोटे सांगितल्याचे त्यांनी कबुल केले. ठाणे नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कुंभार यांनी मुलांना पालकांच्या स्वाधीन केले.