केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. एकंदर १६ हजार ९३३ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यंदा प्रथमच आयोगाने ५० दिवसांत पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. देशभरातील ५९ शहरांतील २१३७ केंद्रांवर ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेला तब्बल चार लाख ५२ हजार ३३४ उमेदवार बसले होते. ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी जास्त होती.
आयोगाने पूर्वपरीक्षेत वैद्यकीय, अभियांत्रिकी व व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना सोयिस्कर ठरेल असा अभ्यासक्रम ‘सिव्हिल सव्‍‌र्हिसेस अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट’ (सीसॅट) या पेपरमध्ये समाविष्ट केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. ग्रामीण भागातील उमेदवारांना मागे टाकण्यासाठीच हा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आल्याची ओरड झाली होती. या पाश्र्वभूमीवर आयोगाची पूर्वपरीक्षा झाली. मंगळवारी या परीक्षेचा निकाल आयोगाने जाहीर केला. त्यात १६ हजार ९३३ उमेदवार उत्तीर्ण झाले. ५० दिवसांतच पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळणार आहे. मुख्य परीक्षा १४ ते २० डिसेंबरदरम्यान होईल. दरम्यान, भारतीय वनसेवेच्या पूर्वपरीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला असून ११०६ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
माहिती अधिकारातील अर्जाना बंदी
आयोगाने उमेदवारांना माहिती अधिकार कायद्याखाली आरटीआय याचिका दाखल करण्यास आयोगाने मज्जाव केला आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व उमेदवारांना त्यांची गुणपत्रिका देण्यात येईल. त्यामुळे आपल्याला कोणत्या विषयात किती गुण मिळाले याची माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी आरटीआय याचिका दाखल करू नये, त्याची दखल घेतली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.