सीईटीसाठी धोरण नसल्याचा विद्यार्थ्यांना फटका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी बदलणाऱ्या प्रवेश परीक्षांबाबतच्या धोरणाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. गेली पाच वर्षे वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत.

राज्यात २०१२ पर्यंत राज्याच्या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून (एमएच-सीईटी) वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश करण्यात येत होते. त्यानंतर २०१३ मध्ये मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) देशपातळीवर एकच परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमाच्या आधारे देशपातळीवरील ‘नीट’ ही परीक्षा घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयामध्ये या एकत्रित परीक्षेच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाच्या निकालानुसार २०१३ मध्येच ‘नीट’ ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे २०१४ मध्ये पुन्हा एकदा राज्यपातळीवरील प्रवेश परीक्षा सुरू करण्यात आली. त्यासाठी अभ्यासक्रम मात्र ‘नीट’चा म्हणजे सीबीएसई बोर्डाचा होता. या अभ्यासक्रमावर आक्षेप आल्यानंतर २०१५ मध्ये राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले.

या वर्षी २०१२ पर्यंत ज्या प्रकारे सीईटी घेतली जात होती त्याच पद्धतीने म्हणजे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी एकत्रित सीईटी घेण्यात येणार आहे. आता पुन्हा पुढील वर्षीपासून प्रवेश परीक्षेचे स्वरूप बदलण्याच्या मार्गावर आहे.

दरवर्षी बदलणाऱ्या परीक्षेच्या स्वरूपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे मत या क्षेत्रातील अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत दिलीप शहा यांनी सांगितले, ‘वैद्यकीय शिक्षणाकडे वळू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी सीईटीच्या बदलणाऱ्या धोरणाचा फटका बसत आहे. पात्रता असूनही या विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. त्याचप्रमाणे सीबीएसईचा अभ्यासक्रम या प्रवेश परीक्षेसाठी असेल, तर देशभरात एकच अभ्यासक्रम लागू करावा. सीबीएसई आणि राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमांत असलेल्या फरकामुळेही विद्यार्थ्यांचे नुकसान होते.’

मी आता बारावीत जाणार आहे. पुढील वर्षी सीईटी द्यायची असेल तर कोणत्या मंडळाचा अभ्यासक्रम समोर ठेवून तयारी करायची ते कळत नाही. कोणतीही परीक्षा असली तरी ती आयत्या वेळी जाहीर करू नये. प्रवेश परीक्षांचे स्वरूप वेगळे असल्यामुळे त्याची स्वतंत्र तयारी करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घ्यायला हवे.

ओजस केतकर, विद्यार्थी

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cet policy effect on student
First published on: 13-04-2016 at 17:01 IST