दुष्काळाची धग शिक्षणक्षेत्रालाही बसत असून, वाढत्या पाणीटंचाईमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षाही नियोजित वेळेच्या किमान १५ दिवस आधीच घेतल्या जाणार आहेत. परीक्षा वेळेपूर्वी घेण्यासाठी चालू सत्रातील सर्व अभ्यासक्रम (किमान ९० तासिका) लवकर कशा संपवता येतील, या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. याचाच भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्याच (गुरुवारी) या संदर्भात महाविद्यालयांचे प्राचार्य व सर्व संबंधितांची बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील औरंगाबादसह जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्य़ांत ४२० विविध महाविद्यालये असून, पावणेतीन लाख विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या शाखेत शिक्षण घेत आहेत. या चारही जिल्ह्य़ांतील किमान दीडशे महाविद्यालयांमधून विद्यार्थी वसतिगृहांची सोय असून सुमारे ४५ ते ५० हजार विद्यार्थी वसतिगृहात राहतात. विद्यापीठात मुलांची ६ व मुलींची ४ वसतिगृहे असून, १ हजार ३२० विद्यार्थी-विद्यार्थिनी या सुविधेचा लाभ घेत आहेत.
मात्र, प्रामुख्याने ग्रामीण भागात मोठय़ा महाविद्यालयांमध्ये वसतिगृहांमधून हजाराच्या संख्येने राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पाणी कसे पुरवायचे, हा प्रश्न निर्माण झाल्याने परीक्षांचे वेळापत्रक अलीकडे घेण्याचे विद्यापीठाने ठरविले आहे. कन्नड, वैजापूर तालुक्यातील वसतिगृहांना तीव्र पाणीटंचाईचा फटका बसू लागला आहे.
नियमन कोलमडले!
विद्यापीठाचे चालू सत्राचे नियमन (अॅकॅडेमिक कॅलेंडर) आधीच कोलमडले आहे. त्यात सत्रातील ९० तासिकांचे वेळापत्रक पूर्ण कधी व कसे होणार, हाही प्रश्न आहे. त्यामुळे वेळेच्या आधी अभ्यासक्रम संपवून परीक्षा लवकर घेणे कसे साध्य होणार, हाही प्रश्न असल्याची चर्चा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2013 रोजी प्रकाशित
दुष्काळामुळे आता शैक्षणिक सत्रालाही कात्री!
दुष्काळाची धग शिक्षणक्षेत्रालाही बसत असून, वाढत्या पाणीटंचाईमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षाही नियोजित वेळेच्या किमान १५ दिवस आधीच घेतल्या जाणार आहेत. परीक्षा वेळेपूर्वी घेण्यासाठी चालू सत्रातील सर्व अभ्यासक्रम (किमान ९० तासिका) लवकर कशा संपवता येतील, या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
First published on: 10-01-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education session reduced due to drought