राज्यातील विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश या वर्षीपासून केंद्रीय प्रवेश पद्धतीने करण्यात येणार असून त्यासाठी पाच प्रवेश फे ऱ्या होणार आहेत. मात्र अजूनही उच्च शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केलेले नाही. राज्यातील विधी महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियाही इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी पाच प्रवेश फे ऱ्या होणार आहेत. पहिल्या तीन फे ऱ्यांसाठी एकच अर्ज ग्राह्य़ धरण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे गुण आणि त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात येणार आहे. त्यानंतर चौथ्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना अर्जात बदल करण्याची संधी मिळणार आहे. पाचवी प्रवेश फेरी ही महाविद्यालयाच्या स्तरावर होणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे माहितीपुस्तक उच्च शिक्षण विभागाने अद्याप जाहीर केलेले नाही. त्याचप्रमाणे सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरीही या परीक्षेबाबत उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेच्या अंतिम निर्णयावर पुढील कार्यवाही अवलंबून आहे. महाविद्यालयांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश फे ऱ्या या प्रक्रियेसाठी साधारण महिन्याभराचा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे या वर्षीपासून विधी महाविद्यालयांचे वर्षभराचे वेळापत्रकच बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five rounds for admission in law degree
First published on: 04-07-2016 at 03:53 IST