परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अभ्यासाची उजळणी आणि वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवणे अधिक फायदेशीर ठरते. स्पर्धा परीक्षांची सवय नसल्यामुळे गेल्या वर्षीची परीक्षा अवघड गेल्याचा अनेकांचा अनुभव असेल. त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याची सवय हवी. अनेक वेळा उत्तर माहीत असते पण ते नेमक्या वेळी आठवत नाही, असाही अनेकांचा अनुभव असेल. प्रश्न पाहणे, पर्याय पाहणे आणि त्यातून नेमके उत्तर सुचणे ही मेंदूची प्रतिक्षिप्त क्रिया असली पाहिजे. त्यासाठी वेळेचे नियोजन करून प्रश्न सोडवण्याचा सराव आवश्यक आहे. एखादा विषय घ्यायचा, तो विषय संपला की त्या विषयावरचे शंभर ते दोनशे बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे. अशा तऱ्हेने सर्व अभ्यासक्रम प्रश्न सोडविण्याच्या मार्गाने पूर्ण करायचा. त्यासाठी कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचे प्रश्न सोडवायचे याचे अचूक नियोजन हवे.

तयारी कशी तपासाल?
दिवसभराच्या नियोजनाचे दोन भाग करायचे. पहिला भाग थोडी नवी तयारी करण्यासाठी आणि झालेली तयारी तपासण्यासाठी, तर दुसऱ्या भागात परीक्षा देण्याचा सराव करण्यासाठी. पहिल्या भागात एक विषय घेऊन त्याची टिपणे, अधोरेखित केलेले भाग पाहायचा; मग पुस्तक बंद करायचे आणि मग त्या विषयाचे बहुपर्यायी प्रश्न सोडवायला घ्यायचे. प्रश्न सोडवताना पर्याय झाकून टाकायचे. पर्याय न पाहता उत्तर देता आले तर त्याचा अर्थ असा आहे, की तुमचा तो भाग तयार आहे. मात्र, उत्तर नाही आले तर त्या प्रश्नावर खूण करायची आणि त्या वेळी तो प्रश्न सोडून द्यायचा. एकूण २०० प्रश्नांपैकी जर १४० हून अधिक उत्तरे पर्याय न पाहताही बरोबर आली तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. जर १४० हून कमी उत्तरे बरोबर आली, तर अजून थोडय़ा तयारीची आवश्यकता आहे. मात्र, १०० हून कमी उत्तरे बरोबर आली, तर ती धोक्याची घंटा आहे. आपण अगदी आत्मविश्वासाने उत्तर दिले आणि ते चुकीचे निघाले, तर त्याच्याइतके घातक दुसरे काही नाही. पर्याय न पाहता मला उत्तर येते आहे अशा आविर्भावात उत्तर ठोकून देणे आणि मग ते चुकीचे निघणे हे जास्त धोकादायक आहे.
पर्याय न पाहता ज्या प्रश्नांची उत्तरे आठवलेली नाहीत त्यांचे पर्याय पाहायचे. काही वेळा चार पर्याय पाहिल्यानंतर उत्तर लक्षात येते. थोडा विचार केल्यावर उत्तर सुचते. पर्याय पाहून उत्तर सुचले, तर त्या प्रश्नाशी संबंधित भागातील काही संदर्भाची उजळणी करण्याची गरज आहे, असे समजावे. मात्र, पर्याय पाहिले, बुद्धी ताणली तरी काहीही उत्तर सुचत नाही, असा भाग कच्चा आहे असे समजावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तयारी कशी कराल?
ज्या प्रश्नांची उत्तरे आली नाहीत. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी ‘ओपन बुक टेस्ट’ची पद्धत वापरता येईल. प्रश्नाचे उत्तर आले नाही, तर ते संदर्भ पुस्तकातून शोधायचे. उत्तर शोधताना लक्षात येणारे नवे मुद्दे वहीत नोंदवून ठेवायचे. यामुळे तुम्हाला न आलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेलच, पण नकळतपणे आणखी २५ प्रश्नांची तयारी होईल. मात्र, उत्तर शोधताना वेळेचे भान ठेवा. दिवसभरात एकाच प्रश्नाचे उत्तर मिळाले असे होऊ नये. गाइडमधील उत्तराचा पर्याय शोधून ते पाठ करू नका. प्रश्नाचे संदर्भ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to prepare for exam and revision
First published on: 20-11-2014 at 01:40 IST