राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबत चर्चा करून सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. चर्चेचा सूर सकारात्मक असला तरी पुढील आठवडय़ात आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीत महासंघाच्या मागण्यांबाबत काय चर्चा होते त्यावर पुढची भूमिका ठरेल, अशी महासंघाची भूमिका आहे. यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर टांगती तलवार कायम आहे.
शनिवारी मंत्रालयात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष डी. बी. जांभरुणकर, सरचिटणीस अनिल देशमुख, कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते व संघाचे अन्य पदाधिकारी यांची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा केली. अधिवेशन कालावधीमध्ये पुन्हा एकदा बठक घेऊन उर्वरित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात येईल व निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले असून संघाने आंदोलन करू नये, असे आवाहन केले आहे. मात्र मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघत नाही तोपर्यंत असहकाराचा निर्णय मागे घेणार नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिक्षकांच्याच प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेने नुकतीच तावडे यांची भेट घेतली होती. या बैठकीत शहरातील सी.बी.एस.ई. बोर्ड तसेच आंतरराष्ट्रीय शाळा मराठी शिकवीत नसल्याची बाब शिक्षमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्याचे सेनेचे सरचिटणीस यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट केल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsc examination
First published on: 08-03-2015 at 04:56 IST