अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीची पहिली यादी जाहीर होण्याच्या तोंडावर न्यायालयाच्या आदेशानंतर काही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढत असल्यामुळे तंत्रशिक्षण विभागाची सोमवारी पळापळ झाली. पहिल्या फेरीची सोमवारी जाहीर होणारी प्रवेश यादी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचाही भ्रमनिरास झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. पहिल्या फेरीची प्रवेश यादी तंत्रशिक्षण संचालनालयाने सोमवारी जाहीर केली. या वर्षी अभियांत्रिकीच्या साधारण दीड लाख जागांसाठी साधारण १ लाख १९ हजार प्रवेश अर्ज आले आहेत. पहिली प्रवेश यादी सोमवारी (२७ जून) सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होती. मात्र प्रवेश यादी वेळेवर जाहीर झाली नाही. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने कारवाई केलेली मुंबईतील काही महाविद्यालये न्यायालयात गेली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर या महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात जाहीर करण्यात आलेल्या प्रवेश यादीमध्ये फरक पडणार आहे. यादीमध्ये बदल करण्यासाठी वेळ लागल्यामुळे प्रवेश यादी वेळेवर जाहीर होऊ शकली नाही, असे तंत्रशिक्षण सहसंचालक दयानंद मेश्राम यांनी सांगितले.तंत्रशिक्षण विभागाच्या नियोजित वेळापत्रकानुसार पहिल्या प्रवेश यादीनुसार विद्यार्थ्यांनी मंगळवार (२८ जून) ते ५ जुलैपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर ७ जुलैला दुसरी प्रवेश यादी जाहीर होणार आहे. पहिल्या फेरीत हवे ते महाविद्यालय मिळाले नाही, तर आतापर्यंत विद्यार्थी या फेरीतून बाहेर पडत होते. मात्र आता पहिल्या फेरीत सहभागी झाल्याशिवाय विद्यार्थी दुसऱ्या फेरीत जाता येणार नाही. त्यामुळे पहिल्या फेरीतच बहुतेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतील, असेही मेश्राम यांनी सांगितले.

संकेतस्थळाबाबत पालकांची तक्रार

पहिल्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पर्याय देण्यासाठी रविवारी (२६ जून) सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत होती. मात्र, संकेतस्थळ सुरू होण्यास अडचणी येत असल्यामुळे प्राधान्यक्रम देता आले नाहीत, अशी तक्रार पालकांनी केली आहे. विद्यार्थ्यांना मुळातच अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली होती. त्याचप्रमाणे पालकांची कोणतीही तक्रार आलेली नाही, असे मेश्राम यांनी सांगितले.

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase access of engineering capacity after court decision
First published on: 28-06-2016 at 03:24 IST