पुण्याच्या शुक्रवार पेठेतील ‘आदर्श शिक्षण मंडळी’ या नामांकित संस्थेतर्फे चालविली जाणारी ‘आदर्श पूर्व प्राथमिक शाळा.’ म्हटली तर ही बालवाडी. पण, विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, स्नायूंचा विकास, स्वावलंबन, बौद्धिक विकास, आत्मविश्वास, क्रियाशीलता वाढविणाऱ्या अनेक उपक्रमांनी ही शाळा आपल्या शाळेतील चिमुकल्यांचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी झटते आहे. शाळेतील अनेक उपक्रम बालवाडी चालविणाऱ्यांना मार्गदर्शक ठरतील असे आहेत.
गरीब वा कनिष्ठ मध्यमवर्गीय पण मुलांना उत्तम व चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याची जिद्द असलेले पालक हे शाळेचे वैशिष्टय़. हातावर पोट असलेल्या येथील पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे फारसे लक्ष देता येत नाही. शाळेला याची जाणीव आहे. म्हणूनच वैयक्तिक स्वच्छतेपासून संस्कृती-सणाच्या महतीपर्यंत, अभ्यासापासून खेळापर्यंत असे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी जे जे पूरक ठरेल ते ते ही शाळा देण्याचा प्रयत्न करते.
शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागतच छान तयारीने केले जाते. फुले-फळे, फुगे, खेळणी यांनी वर्ग सजवून मुलांचे शाळेविषयीचे आकर्षण वाढविले जाते. शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मुलांचे प्रेमाने स्वागत केले जाते. शाळा सुरू झाल्यानंतर दिंडीचा सोहळा, पालखी मिरवणे हे कार्यक्रम आयोजित केले जातात. वटपौर्णिमेच्या निमित्ताने मुलांकडून शाळेत वृक्षारोपण केले जाते. त्याबद्दलची माहिती दिली जाते.
जूनमध्येच संपूर्ण वर्षांचे कार्यक्रम, उपक्रम, नियम व सूचना असलेली दिनदर्शिका नावाचे कॅलेंडर दिले जाते. वार्षिक नियोजन असे गटांनुसार अभ्यासक्रमाची पुस्तके दिली जातात. त्यात त्यांचा विषयानुसार प्रत्येक महिन्याचा अभ्यास व गाणी-गोष्टी वगैरे लिहिलेले असते. अंक व अक्षरे गिरवण्यासाठी वहय़ा असतात. छोटय़ा गटाला बौद्धिक मेवा व चित्रकलेची पुस्तके असतात. हस्तव्यवसाय, चिकटकाम, स्प्रे पेंटिंग, ठसेकाम, कोलाजकाम, शिवणकाम वगैरे शिकविले जाते.
जुलैमध्ये गुरुपौर्णिमेचे आयोजन केले जाते. त्यानंतर दीपपूजन करून दिवा दाखवून मुलांना त्याचा परिचय करून दिला जातो. मातीचा नाग दाखवून त्याची माहिती दिली जाते. मुलींच्या हातावर मेहंदी काढणे, प्राणी-पक्षी कृतज्ञता दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने गांडुळखत प्रकल्प मुलांना दाखविण्यात येतो. प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या विषयांवर पालकसभा घेतली जाते. दातांचे आरोग्य, सकस आहार, बालकांचे आरोग्य या विषयातील तज्ज्ञ बोलावून पालकांच्या ज्ञानात भर पडावी हा या सभांमागील हेतू.
ऑगस्टमध्ये मुलांचे कथाकथन, शिवाजी महाराज, टिळक, गांधीजी, नेहरू या थोर पुरुषांची माहिती गोष्टीरूपात सांगणे, मुलांनी राखी तयार करणे, चित्रे रंगवून दहीहंडीऐवजी चित्रहंडीचा कार्यक्रम शाळेत साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी समूहगीत, संस्कृतगीत, म्युझिक कवायत असे कार्यक्रम सादर केले जातात. यात ढोल, ताशा, झांजा, खंजिरी हे सर्व लहान मुलेच वाजवतात.
मातृदिनानिमित्त मुलांककडून गजरा ओवून घेतला जातो. तो गजरा घरी गेल्यावर आईला द्यायला सांगितले जाते. शाळेत श्रावणी शुक्रवारही साजरा केला जातो. निसर्गपूजेच्या निमित्ताने पर्यावरणविषयक माहिती दिली जाते. डोंगर, दऱ्या, नदी, समुद्र, वाळवंट, जंगल, हिरवळ तयार केले जाते. या दिवशी मुलांना फळांचा प्रसाद वाटला जातो. लहानपणापासूनच मुलांमध्ये सर्वधर्मसमभाव रुजावा यासाठी मुलांना मंदिर, चर्च, मशीद या देवस्थानांमध्ये नेतो. या वेळी रस्त्याने कसे चालायचे याचे नियम समजावून सांगितले जातात. या शिवाय मुलांच्या सर्वागीण विकासासाठी पुढील उपक्रम राबविले जातात.
गप्पागोष्टी – यामुळे मुलांचा भाषाविकास होतो. विचाराची देवाणघेवाण करायला मुले शिकतात. पूर्ण वाक्यात बातमी अथवा निरोप सांगायला शिकतात.
परिचय पाठ – बुद्धीला चालना मिळावी यासाठी निरनिराळ्या वस्तूंचा परिचय करून दिला जातो.
भाषा – शब्दसंग्रह वाढविणे, वाक्यरचना सुधारणे
व्याकरण खेळ – लिंग-वचनाचा बदल, शब्दांचा योग्य वापर हे शिकायला मिळते.
पंचेंद्रिय विज्ञान – मूळ रंग, आवाज ओळखणे, स्पर्शज्ञान, दाबक्षमता यात विकसित केले जाते
प्रयोग – तरंगणे, बुडणे, गहू-वाटाणे पेरणे, निरनिराळ्या चवी देणे, हवेच्या गमती-जमती, विरघळणे-न विरघळणे, ड्रॉपरचा उपयोग दाखविले जातात. यामुळे मुलंची निरीक्षणशक्ती वाढते, स्नायूंचा विकास होतो, स्नायूंवर नियंत्रण येते. बुद्धीला चालना मिळते.
जीवनव्यवहार – भाजी निवडणे, बटाटे सोलणे, दाणे कुटणे, पाटय़ावर खडे मीठ वाटणे. यामुळे स्वालंबन, स्वानुभवाची सवय होते. स्नायूंचा विकास होतो. मुले अनुकरणशील होतात.
हस्तव्यवसाय – मातीकाम, ठसेकाम, रांगोळी, चित्र रंगविणे, घडीकाम. यामुळे बौद्धिक, सौंदर्यदृष्टीचा विकास होतो. कल्पनाशक्तीला, कौशल्याला वाव मिळतो.
खेळ – शाळेत मैदानी खेळ, बैठे खेळ घेतले जातात. यामुळे व्यायाम होतो, आत्मविश्वास, धीटपणा, भूक, निर्णयक्षमता वाढते. मनोरंजन, सामाजिक, व्यक्तिमत्त्व विकास होतो.
मुक्त व्यवसाय – मुक्तपणे खेळणे. यावर कुणाचेही बंधन नसते.
रचनात्मक खेळ – यामध्ये स्वकल्पनेने निरनिराळ्या रचना काढायला दिल्या जातात. यामुळे क्रियाशीलतेला वाव आणि विचारांना चालना मिळते. बौद्धिक विकास होतो व स्नांयूवर ताबा येतो.
या शिवाय इंग्रजी, संस्कृत संभाषणासाठी तज्ज्ञ शिक्षक नेमले आहेत. शाळेत प्रोजेक्टर व डीव्हीडीवर अंक, अक्षरे, परिचय पाठाची गाणी, गोष्टी आदी दाखविले जाते. शाळेला मोठे क्रीडांगण असून वाळूचा हौद आहे, मुलांना यात मुक्तपणे खेळता येते. या शिवाय शिक्षक दिन, गणेशोत्सवात नामांकित गणेशमूर्तीचे दर्शन, गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता कार्यक्रम, नवरात्रोत्सवानिमित्त भोंडल्याचा, पाटीपूजनाचा कार्यक्रम केला जातो. कोजागिरी पौर्णिमा शाळेच्या पटांगणात साजरी केली जाते. सायंकाळी मुलांना गरम दूध, पोहे अशा खाण्याचा आस्वाद दिला जातो. दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांचा, तोरणे, पणत्यांच्या रांगा, किल्ला, आतशबाजी, खमंग फराळ अशी मेजवानी असते. या शिवाय भातुकलीचा खेळ, स्नेहसंमेलन, शेकोटीचा कार्यक्रम, क्रीडा महोत्सव, सहल, प्रजासत्ताक दिन, पोस्ट ऑफिस भेट, आरोग्य तपासणी, डॉक्टर, परिचारिका, पोलीस, वकील आदी व्यावसायिकांशी संवाद असे कार्यक्रम आयोजिले जातात. मार्च महिन्यात होणारा चवींचा सप्ताह हे आणखी एक वैशिष्टय़. चवींची ओळख व्हावी यासाठी ठरविलेल्या चवींप्रमाणे मुलांनी डब्यातून खाऊ आणायचा असतो. मुलांच्या शालेय आयुष्याची पायाभरणी सर्व बाजूंनी पक्की करण्यासाठी शाळेत राबविले जाणारे आणखीही अनेक उपक्रम आहेत. त्यामुळे, पुढे ही मुले जेव्हा हायस्कूलमध्ये जातात तेव्हा सर्वच क्षेत्रांत चमकतात.
सहशिक्षिका, आदर्श पूर्व प्राथमिक शाळा, शुक्रवार पेठ, पुणे-२.
संपर्क – ९८६०६१४८९६
कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी.
संपर्कासाठी पत्ता : ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१. दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७
reshma.murkar@expressindia.com, reshma181@gmail.com