गेल्या अनेक दिवसांपासून चच्रेचा विषय ठरलेल्या डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनाच्या चच्रेला शनिवारी पूर्णविराम मिळण्यची शक्यता आहे. याबाबत राज्यपाल के.शंकरनारायण यांच्याकडून सूचना मिळाल्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी शनिवारी व्यवस्थापन परिषदेची तातडीची बठक बोलविली आहे. या बठकीत हातेकर यांच्या निलंबनावर फेरविचार होण्याची शक्यता आहे.
प्राध्यापक हातेकर यांच्या निलंबनाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर शुक्रवारी राज्यपाल के.शंकरनारायण यांनी कुलगुरू डॉ. राजन वेळुकरांना बठकीसाठी बोलविले होते. त्यावेळी त्यांना याप्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आदेश राज्यपालकांकडून देण्यात आले होते. त्याचपाश्र्वभूमीवर डॉ. वेळुकर यांनी बोलविलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागून राहीले आहे. तर दुसरीकडे हातेकर यांचे निलंबन मागे न घेता तात्काळ याप्रश्नी समिती नेमून येत्या आठवड्याभरात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मुख्य म्हणजे, व्यवस्थापन परिषदेची सध्याची एकूण सदस्य संख्या लक्षात घेता यात बुक्टू या शिक्षक संघटनेचे अनेक सदस्य असून त्यांनीही हातेकरांना काही दिवसांपूर्वी पाठिंबा दर्शविला होता. तर दुसरीकडे डॉ. वेळुकर यांच्या गटातील सदस्य काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
आदित्य ठाकरे – हातेकर भेट
युवासेनेच अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी डॉ. हातेकर यांची भेट घेतली.   हे विद्यार्थ्यांचे आंदोलन असून त्यात कोणताही थेट राजकीय हस्तक्षेप नको असे स्पष्ट केल्याचे समजते.  हातेकर यांच्या निलंबनाच्या विरोधात  ‘स्टुडंट जॉइंट अ‍ॅक्शन फ्रंट’ची बठकीही शनिवारी संध्याकाळी बोलविण्यात आली आहे. दरम्यान या फ्रंटतर्फे येत्या २० जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university to rethink on professor neeraj hatekar suspension
First published on: 18-01-2014 at 03:43 IST