अभ्यासक्रमाच्या तुलनेत अध्यापनासाठी मिळालेल्या अपुऱ्या वेळेमुळे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र यापैकी कोणत्याही विषयाला न्याय देऊ शकलो नसल्याची सार्वत्रिक भावना बारावीच्या शिक्षकांमध्ये आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या या हतबलतेचे सर्वाधिक बळी अर्थातच क्लासला जाऊ न शकणाऱ्या ग्रामीण भागात आढळून येतील. आपल्या अध्यापनाविषयी शिक्षकांमध्येच आत्मविश्वास नसल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांची अवस्था यंदा ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून’ अशी झाली आहे.
बारावी विज्ञानाच्या रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र या विषयांच्या सुधारित अभ्यासक्रमाचा आवाका खूप मोठा आहे. त्यातल्या त्यात रसायनशास्त्राने तर विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्या तोंडालाही फेस आणला आहे. प्रत्येक विषयासाठी नेमून दिलेल्या तासिकांमध्ये तर हा अभ्यासक्रम संपविणे बिलकूल शक्य नाही. पण, पूर्वपरीक्षेआधी संपूर्ण अभ्यासक्रम संपवायचा म्हणून अनेक महत्त्वाचे धडे घाईघाईत उरकल्याची भावना विज्ञानाच्या सर्वच शिक्षकांमध्ये आहे. परिणामी आम्हीच आमच्या अध्ययनाविषयी समाधानी नाही, अशी प्रतिक्रिया मिठीबाई महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विषयाचे प्रा. मयूर मेहता यांनी दिली.
याला अपवाद मे, दिवाळीच्या अथवा आठवडी सुट्टीत जादा तास घेऊन मुलांची तयारी करवून घेणाऱ्या काही महाविद्यालयांचा. पण, अशी कनिष्ठ महाविद्यालये महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतकीच आहेत. उर्वरित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अध्यापनाच्या दृष्टीने बोंब आहे. बारावीला विज्ञानाच्या एका विषयासाठी दर आठवडय़ाला तीन तासिका दिल्या जातात. मात्र, सुधारित अभ्यासक्रम इतका आहे की हा वेळ अभ्यासक्रम संपविण्यास पुरेसा नाही, अशी प्रतिक्रिया नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. एस. बी. चव्हाण यांनी व्यक्त केली. या महाविद्यालयात बारावीबरोबरच नीट, एचएचटी-सीईटी, जेईई आदी सामायिक प्रवेश परीक्षांसाठी लातूर पॅटर्नच्या धर्तीवर विद्यार्थ्यांकडून विशेष तयारी करवून घेतली जाते.
दरवर्षी सुमारे ६०० विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय विशेष वर्ग घेते. पुढील वर्षी बारावीला येणारे विद्यार्थी अकरावीला असतानाच महाविद्यालय बारावीचा अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात करते. बारावीचे वर्ष सुरू होतानाच म्हणजे जून-जुलैपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होतो. पुढील महिने पाठांतर, सराव, प्रश्नपत्रिका सोडविणे, शंका निरसन यासाठी दिला जातो. यावर्षीही महाविद्यालयाने आदल्या वर्षी डिसेंबरपासूनच बारावीचे वर्ग सुरू केले. मात्र, या वर्षी अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत सप्टेंबर उजाडला, असे डॉ. चव्हाण सांगतात. मे महिन्याची, दिवाळीची, आठवडी सुट्टी न घेता हा अभ्यासक्रम पूर्ण केला गेला. यात अभ्यासक्रमाच्या कर्तव्यपूर्तीतून मुक्त झाल्याची भावना असली तरी शिकविण्याचे समाधान नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दिवसरात्र, सुट्टीची तमा न बाळगता एका ध्येय्याने प्रेरित होऊन शिकविणाऱ्या महाविद्यालयात ही स्थिती आहे, तर उर्वरित महाविद्यालयांमध्ये ती किती गंभीर असेल याची कल्पनाच न केलेली बरी. वाढीव अभ्यासक्रमाचा हा बोजा पेलण्यासाठी अध्यापनामध्ये पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन, स्लाईड शो आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा. जेणे करून गणित किंवा रसायनशास्त्रातील टेबल्स किंवा समीकरणे फळ्यावर लिहिण्यासाठी लागणारा वेळ वाचेल, अशी सूचना त्यांनी केली. विज्ञानाच्या महत्त्वाच्या विषयांच्या पेपरमधील दिवसांचे अंतर वाढविल्यास विद्यार्थ्यांना किमान सरावासाठी तरी वेळ मिळेल, अशी भावना प्रा. मेहता यांनी व्यक्त केली. (क्रमश:)
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2013 रोजी प्रकाशित
अपुऱ्या वेळेमुळे विषयाला न्याय नाही
अभ्यासक्रमाच्या तुलनेत अध्यापनासाठी मिळालेल्या अपुऱ्या वेळेमुळे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र यापैकी कोणत्याही विषयाला न्याय देऊ शकलो नसल्याची सार्वत्रिक भावना बारावीच्या शिक्षकांमध्ये आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या या हतबलतेचे सर्वाधिक बळी अर्थातच क्लासला जाऊ न शकणाऱ्या ग्रामीण भागात आढळून येतील.
First published on: 12-01-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shortage time cause injustice with the subject