महाविद्यालयाची भूमिका :
१२ वीची परीक्षा संपल्यानंतर जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येतात, तेव्हा तिथल्या मुक्त वातावरणात विद्यार्थी बऱ्याचदा भरकटण्याची शक्यता असते.
महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर लेक्चर्स न बसणे हा अलिखित नियम
झालेला असतो. जेव्हा महाविद्यालय संपत येते, तेव्हा लक्षात येते की आपण
चांगल्या भविष्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करावयास हवी, त्यात एखाद्या
यशस्वी उमेदवाराची मुलाखत वाचून आपण जास्तच प्रभावित होतो.
पुस्तकांच्या दुकानात जातो, पुस्तक घेऊन येतो आणि अभ्यासाला सुरुवात
करतो. मात्र अभ्यासाची सवय कधीच सुटलेली असते, अध्र्या तासात पाठ
दुखावयास लागते, सर्व शक्ती एकवटून अभ्यासाला सुरुवात करतो, स्पर्धा
परीक्षा समजून घ्यावयास पुढचे दोन वर्षे निघून जातात. अगदी गणिताच्या
भाषेत बोलावयाचे झाल्यास पुढची पाच वर्षे निघून जातात. वाढलेले वय,
आपण काही करावे यासाठी पालकांकडून वाढणारा दबाव, यामुळे विद्यार्थी
आणखी भरकटत जातो. अशी अवस्था महाराष्ट्रातील खूपशा विद्यार्थ्यांची
आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर इ. शहरांचा विचार बाजूला ठेवला तर
उर्वरित महाराष्ट्रात विद्यार्थ्यांची वाट अधिकच बिकट आहे, नव्हे ती आपणच
केली आहे.
स्पर्धा परीक्षेत विशेषत: संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षेत पास
होण्यासाठी म्हणजे आय.ए.एस., आय.पी.एस. होण्याची क्षमता महाराष्ट्रीयन
तरुणांमध्ये ठासून भरलेली आहे. एम.पी.एस.सी. किंवा यू.पी.एस.सी. या
परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच झाल्यानंतर तर परिस्थिती जास्तच अनुकूल
झाली आहे. मात्र खेदाची गोष्ट ही आहे, की महाविद्यालयाच्या तीन किंवा चार
वर्षांच्या दरम्यान जी तयारी व्हावयास हवी ती होत नाही. यू.पी.एस.सी. किंवा
एम.पी.एस.सी. परीक्षेच्या तयारीसाठी ही तीन वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात
आणि त्यांचा योग्य प्रकारे वापर व्हावा. या परीक्षेसाठी लागणारा अभ्यास म्हणजे
इतिहास, भूगोल, भारतीय संविधान, सायन्स, अर्थशास्त्र यांचा अभ्यास अत्यंत
सविस्तरपणे महाविद्यालयामध्ये होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थी माझ्याकडे यूपीएससी परीक्षेच्या मुख्य
परीक्षेच्या भूगोल या वैकल्पिक विषयाचे मार्गदर्शन घेण्यासाठी आला. त्याने
आधी दोन वेळा मुख्य परीक्षा लिहिली होती. तो ज्या महाविद्यालयामधून आला
होता, त्या महाविद्यालयामधील भूगोल विभागाच्या जवळजवळ सर्व
प्राध्यापकांना मी चांगले ओळखत होतो. त्यातील काही प्राध्यापक खूपच तज्ज्ञ
होते. सहज मी त्या विद्यार्थ्यांला प्रश्न विचारला, की त्याने महाविद्यालयामध्ये असताना किंवा महाविद्यालय संपल्यानंतर त्या प्राध्यापकांची का मदत घेतली नाही, तेव्हा उत्तर मिळाले की त्यांना यूपीएससीबद्दल विशेष माहिती नाही. मान्य आहे त्यांना यूपीएससी परीक्षेबद्दल विशेष माहिती नसेल, परंतु यूपीएससी परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी त्या विद्यार्थ्यांने जो वैकल्पिक विषय घेतला होता, त्याचे ज्ञान मात्र त्यांच्याकडे खूपच चांगले होते. फक्त मुख्य परीक्षेचा त्या विषयाचा अभ्यासक्रम त्यांच्याकडे घेऊन जाऊन त्यांच्याकडून खूप चांगली मदत होऊ शकली असती आणि जर त्याने हाच अभ्यास महाविद्यालयामध्येच पूर्ण केला असता तर यश मिळण्याची शक्यता जास्त निर्माण झाली असती.
यूपीएससीच्या तयारीसाठी महाविद्यालयाची कशी मदत होऊ शकते ?
* महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यापासून म्हणजे पदवीच्या प्रथम
वर्षांपासूनच अभ्यासाला सुरुवात करावी, म्हणजे येणाऱ्या तीन किंवा चार
वर्षांत यूपीएससीची तयारी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते.
* यूपीएससी व एमपीएससी परीक्षेच्या पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
व्यवस्थित समजला नाही तर संबंधित विषयांच्या प्राध्यापकांकडून समजून
घ्यावा. अभ्यासक्रमासंबंधी पुस्तकं आपल्या ग्रंथालयात उपलब्ध असतील तर
त्यांचे वाचन करावे, याशिवाय इतर पुस्तकांचेही वाचन करावे.
* या काळात इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करावा. संपूर्ण
यूपीएससी परीक्षा जरी मराठीत देता येत असली तरी इंग्रजीचे महत्त्व कमी होत
नाही. निवड झाल्यानंतर प्रशासकीय कामात बऱ्याच वेळा इंग्रजीचा संबंध
येणारच असतो, याशिवाय यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत काही उतारे फक्त
इंग्रजीमध्ये असतात व मुख्य परीक्षेत ३०० गुणांचा एक इंग्रजीचा पेपर
लिहावाच लागतो. जरी त्या गुणांचा वापर अंतिम यादीसाठी केला जात नसला
तरी हा पेपर पास होणे आवश्यक आहे. पास झालो नाही तर इतर पेपर तपासले
जात नाहीत, म्हणजे आपण परीक्षेत अपयशी ठरतो.
* संघ लोकसेवा आयोगाच्या तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी गणित हा
घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यूपीएससीच्या प्रारंभिक परीक्षेसाठी सी सॅटचा जो
दुसरा पेपर आहे त्यात गणिताचा हा घटक येतो. जरी हा पेपर फक्त गणितावरच
आधारित नसला, तरी ज्या विद्यार्थ्यांची गणितावर पकड घट्ट असते, त्यांना हा
पेपर सोडविताना अडचण होत नाही व त्यांना या पेपरमध्ये जास्तीतजास्त गुण
मिळवून, मुख्य परीक्षेसाठीचा मार्ग सोपा होतो.
* कोठून सुरुवात करावी या प्रश्नाचे उत्तर म्हणजे एन.सी. ई.आर.टी.ची
इ. ५ वी ते १० वी पर्यंतची सर्व विषयांची पुस्तके सर्वप्रथम वाचून टाकावीत.
पदवी झाल्यानंतर या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा पदवीचे शिक्षण घेत
असतानाच ही पुस्तके वाचली असतील, त्यातील मूलभूत संकल्पना समजून
घेतल्या असतील तर पुढचा अभ्यास करणे जास्त सोपे होते.
महाविद्यालयामध्ये असतानाच इतिहास, भूगोल, भारतीय संविधान,
अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना यांचा अभ्यास करून ठेवावा. जमल्यास
त्यांच्या नोट्स तयार करून ठेवाव्यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Upsc preparation from college
First published on: 04-03-2014 at 04:13 IST