06 April 2020

News Flash

खाऊच्या शोधकथा: लाडू

आपल्याकडे पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो.

आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.

एखाद्या पदार्थाच्या नावातच इतका मिट्ट गोडपणा, लाघवीपणा असतो की, तो उच्चारताक्षणी एक सुखद अनुभूती मिळतो. ‘लाडू’, लड्डू या शब्दात हा अनुभव अगदी ठासून भरलेला आहे. भारतीय उपखंडात सगळ्या प्रांतांच्या विविधतेतील एकतेची शब्दश: ‘गोळा’बेरीज म्हणजे लाडू.

लाडू या शब्दाचा उगम हिंदी लड्डूपासून झालेला असला तरी, या लड्डूचे नामकरण नेमके कसे झाले असावे याचे दाखले नाहीत. अर्थातच यामुळे आपल्यापैकी कोणाचेही काही अडत नाही. शादी के लड्डू, प्रमोशनचे लाडू, उत्तम निकालाचे लाडू खाताना जाणवतो तो फक्त त्याचा गोडवा. आनंद द्यावा घ्यावा ही भावना हे लाडू इतकी छान जपतात की, त्यामुळेच प्राचीन काळात याच लाडवांना मोद अर्थात आनंद देणारे या अर्थाने ‘मोदक’ म्हटले जाई. आज आपण मोदक या पदार्थाची पाककृती पूर्णत: भिन्न पाहतो. मात्र अगदी प्राचीन काळापासून नैवेद्याचा, प्रसादाचा आणि मुख्य म्हणजे औषधाचा भाग म्हणून लाडू अस्तित्वात आहेत. औषध म्हणून लाडू असे वाचल्यावर तोंडात अख्खा लाडू कोंबावा तशी ‘आ’ वासल्याची अनेकांची अवस्था होऊ शकते. पण हे एक कटू नव्हे तर ‘गोड’ सत्य आहे. या सत्याकडे येण्यापूर्वी लाडवांचा शोध कसा लागला याविषयी झालेला ऊहापोह पाहू या.

आपल्याकडे पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक वेळी पुरणाची पोळी होत नाही. तसेच लाडवाचे मिश्रण पूर्वापारपासून ज्ञात असावे. मात्र एखाद दिवशी आचाऱ्याकडून मिश्रणात जास्तीचे तूप पडले आणि मिश्रणाचे छोटे छोटे गोळे झाले. ते पाहून लाडू वळण्याची बुद्धी सुचली असावी असे म्हणतात. पण ही दंतकथाच असावी. माणसाची बुद्धी पूर्वीपासूनच खाद्यपदार्थावर प्रयोग करण्यात इतकी तरबेज की, त्या प्रयोगातून मिश्रणाचे लाडू वळले गेले. ने-आण करताना तसेच बांधीवपणासाठी हा गोल आकार सोयीचा आहे हे त्या काळात जाणवले असावे आणि लाडवांना गोलाकार मिळाला असावा.

लाडवाची मिश्रणे असंख्य व अनंत आहेत पण प्राचीन काळी मेथी, सुंठ, तीळ यांचे लाडू औषधी उपचाराचा भाग होते. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात प्रसिद्ध भारतीय शल्यचिकित्सक सुश्रुत त्यांच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना जंतूसंसर्ग होऊ नये त्यासाठी उपाय म्हणून गूळ वा मध यांच्यासह तीळ खाण्यास देत असत. त्याचा आकार लाडवासारखा वळलेला असे. तरुण वयात येणाऱ्या मुलींचे हार्मोन्स संतुलित राहावेत याकरता त्यांनाही विशिष्ट प्रकारचे लाडू दिले जात. बाळंतिणीसाठी मेथी वा अळीवाचे वा डिंकाचे लाडू तर आजही दिले जातात. एकूणच लाडू हा त्या काळी औषधोपचाराचाही एक भाग होता.

पर्शियन आक्रमणानंतर आपल्याकडे लाडू शाही झाला. फळे, सुकामेवा यांचा वापर अधिकतर होऊ लागला. प्रसाद म्हणून लाडू हे समीकरण तर पूर्वापार जुळलेले आहे. सर्वाना समान वाटणी होण्याकरता या लाडवांचा आकार खूपच महत्त्वाचा ठरत असल्याने अनेक मंदिरांनी प्रसाद म्हणून लाडू देणे स्वीकारले. शिवाय टिकण्याच्या दृष्टीने लाडू अधिक सोयीचे.

नारळाचे लाडू आपल्याकडे दक्षिण भागात विशेष लोकप्रिय आहेत. चोला घराण्यापासून या नारियल के लड्डू अर्थात ‘नारियल नाकरू’ला दीर्घ परंपरा आहे. त्या काळात प्रवासास निघालेल्या यात्रेकरूंना किंवा सैनिकांना नारळ लाडू बांधून देण्याची पद्धत होती. यशप्राप्ती यासाठी शुभसंकेत म्हणून नारियल नाकरू आजही दक्षिणेत प्रसिद्ध आहे. कानपूरच्या ‘ठग्गू के लड्डू’ची कहाणी तर फारच गमतीशीर आहे. नावावरून ही प्रसिद्धीसाठीची क्लृप्ती असावी असे वाटते. मात्र या लाडवांचा निर्माता रामावतार ऊर्फ मठ्ठा पांडय़े हा स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वदेशीचा मोठाच पुरस्कर्ता होता. ब्रिटिश आले आणि गुळाची जागा पांढऱ्या शुभ्र साखरेने घेतली. ही साखर लाडू वळणाऱ्यांसाठी मोठेच वरदान ठरली. मात्र स्वदेशीचा मंत्र जपताना आपण इंग्रजी साखर वापरून लोकांना ठगतोय ही बाब रामावतारच्या मनात इतकी होती की, त्याने लाडवांना नावच दिले ठग्गू के लड्डू.

साखरेने लाडवांना बळ दिले ते याकरता की, गुळाचा पाक करून लाडू बनवताना पाक अचूक बनणे अत्यावश्यक होते. अन्यथा लाडवांचा दगड बनायला वेळ लागत नसे. साखरेने ही समस्या चुटकीसरशी सोडवत लाडू बनवणे सोपे केले. २०१५ साली लाडू चर्चेत आले ते वेगळ्या कारणासाठी. इंग्लंडमधले ‘गुलाबी लाडू’ अर्थात ढ्रल्ल‘ ’ं४ि ना एक पाश्र्वभूमी होती. जागतिक कन्या दिवसाच्या निमित्ताने हेतुपूर्वक हे पिंक लड्डू वाटले गेले. मुलगा मुलगी समानतेचा संदेश यातून दिला गेला. दक्षिण आशियायी देशात मुलगा झाल्याचा आनंद लाडू वाटून साजरा करतात. मुलीसाठी मात्र असा आनंदोत्सव नसतो. त्यासाठी हे पिंक लड्डू एक प्रतीक ठरले.

बेसन, रवा, मोतीचूर, मेथी, शेव, नारळ, चणे, बुंदी, शेंगदाणे, तीळ, नाचणी, चुर्मा किती नावं घ्यावी? नावांनीच चार पाने भरून जातील इतके लाडवाचे प्रकार आहेत. आज अन्य मिठायांनी, चॉकलेट्सनी आपल्या मुखात स्वाद निर्माण केला असला तरी काही कार्यात लाडवांशिवाय मजा नाही. एकेकाळी सत्यनारायण असो, साखरपुडा असो, बारसं असो.. त्यासाठी पेपरडिशमध्ये चिवडा आणि लाडू हे ँ्र३ ूे्रुल्लं३्रल्ल होतं. दर्दी मंडळी हातात आलेल्या डिशमधला लाडू कडक बुंदीचा आहे की नरम बुंदीचा हे तपासून अंदाज घेत. आज कडकबुंदीचा लाडू चघळत चघळत तो गोडवा शरीरात भिनू देण्याची गंमत कमी झाली असली तरी लाडू आपला लाडकाच आहे. बेसन लाडू व रवा लाडू यांचे दर्दी चाहते तर राज कपूर ग्रेट का दिलीपकुमार ग्रेट अशा धाटणीचा वादही घालतात. पण या सगळ्या आवडीनिवडीच्या पल्याड लाडू आपला लाडोबा आहे. त्याचा तो गोल गरगरीत आकार, मिठ्ठास स्वभाव आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतो. एकदाच नाही तर पुन:पुन्हा.

– रश्मि वारंग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 1:03 am

Web Title: laddu
Next Stories
1 खाऊच्या शोधकथा: आइसक्रीम
2 खाऊच्या शोधकथा: श्रीखंड
3 खाऊच्या शोधकथा: भेळपुरी
Just Now!
X