दयानंद लिपारे

कोल्हापूर महापालिका, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, पदवीधर मतदारसंघ यांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित आहेत. यावर भाजपने लक्ष केंद्रित के ले आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्य़ात वर्चस्व निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अर्थात भाजपसाठी ही वाट सोपी नाही.

पदवीधर मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांनी दोनदा विजय मिळवला. सन २००४ साली सुरेश हाळवणकर हे भाजपचे पहिले आमदार म्हणून इचलकरंजीतून निवडून आले. त्यांच्यासह कोल्हापूर दक्षिणमधून अमोल महाडिक यांनी २०१४ सालच्या निवडणुकीत यश मिळवले. तर जिल्हा परिषदेत शौमिका महाडिक या भाजपच्या अध्यक्षा बनल्या. इचलकरंजी, जयसिंगपूर, हुपरी, आजरा, मलकापूर यांसारख्या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष बनवण्यात भाजपला यश मिळाले. चंद्रकांतदादा पाटील मंत्रिपदामुळे कोल्हापूर भाजपचा विस्तारही मोठय़ा प्रमाणात झाला. तर, दुसरीकडे छत्रपती घराण्यातील प्रमुखांना भाजपच्या तंबूत आणले गेले. संभाजीराजे छत्रपती हे राष्ट्रपती कोटय़ातून राज्यसभा सदस्य झाले. समरजीतसिंह घाटगे यांना म्हाडा पुणेचे अध्यक्षपद देण्यात आले. आता त्यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा ग्रामीणची अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

संघर्षपर्व 

विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांचे दोन्ही आमदार पराभूत झाले. नाही म्हणायला जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे व अपक्ष प्रकाश आवाडे या जिल्ह्य़ातील आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. राज्यात सत्ता नसल्यामुळे भाजपचा  प्रभाव आता कमी झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. महाडिक परिवाराच्या ताकदीवर भाजप आगामी निवडणुकांमध्ये आपले अस्तित्व पुन्हा दाखवण्यासाठी प्रयत्नशील आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता प्राप्त करणे हे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने आमची मोर्चेबांधणी सुरू आहे,’ असे भाजपचे स्थापनेपासूनचे ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबा देसाई यांनी सांगितले.

पदवीधर मतदारसंघातील निवडणूक महत्त्वाची

चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. त्यामुळे या वेळची पदवीधर मतदारसंघातून निवडणूक कोण लढवणार हे महत्त्वाचे बनले आहे. या ठिकाणी प्रबळ उमेदवार देऊन त्यांना निवडून आणणे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक जिंकणे हे भाजप समोरचे आव्हान आहे. त्यादृष्टीने बांधणी सुरू आहे. त्यासाठी मतदारांची नोंदणी सुरू केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे विरोधक एकत्रित निवडणूक लढवणार असल्याने त्यांच्या नाराजीचा फायदा होऊन भाजप कोल्हापूर महापालिकेवर झेंडा रोवेल.

– राहुल चिकोडे, कोल्हापूर भाजप महानगर अध्यक्ष