राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाला आणखी धार चढणार आहे. गेली पाच वर्षे राज्यातील सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सहकारातील भक्कम भाग असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांसह कालपर्यंत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेशी टोकदार सामना करावा लागणार आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील तसेच प्रत्येक जिल्ह्यात भक्कम स्थान करू पाहणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांशी संघर्ष करताना चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. राज्यातील सत्तेची कवचकुंडले गेल्याने पाटील यांना या तिन्ही पक्षांशी झगडून भाजपचे अस्तित्व टिकवणे आव्हानास्पद बनले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर रंगलेले सत्तानाटय़ विलक्षण होते. या नाटय़ाचा अखेरचा अंक संपताना शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली. शिवसेना व उभय काँग्रेस यांच्या विचारात भिन्नता असली तरी भाजपाला शह देण्याच्या एकमेव उद्दिष्टातून हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. मागील सरकारमधील शिवसेना सत्तेत असूनही दुय्यम स्थानी होती. ती आता सत्तेच्या केंद्रस्थानी आली आहे. तर पाच वर्षांच्या अवधीनंतर दोन्ही काँग्रेसला सत्तेची ऊब मिळाली आहे.

कोल्हापूर सूत्राचा बोलबाला

राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे भिन्न विचारांचे पक्ष एकत्रित आले असले तरी कोल्हापूरकरांना मात्र त्याचे मुळीच नावीन्य नाही. कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात या तिन्ही पक्षांनी हातात हात घालून सत्ता राखली आहे. तर लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही या तिन्ही पक्षांचे सख्य पडद्याआड दिसून आले होते. सत्तेत असताना दुय्यम वागणूक मिळाल्याने शिवसेनेचे जिल्ह्यातील स्थानिक नेते भाजपच्या अस्तित्वाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. तर पाच वर्षे चौकशीचा ससेमिरा, दबाव यामुळे त्रस्त झालेले काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपने डोके वर काढू नये या प्रयत्नात आहेत. त्यातूनच या तिन्ही पक्षांनी भाजपच्या सत्तास्थानांना धक्का देण्याचे नियोजन केले आहे. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे वर्चस्व वाढलेले होते. त्याला आता कोल्हापूर पॅटर्नचा आधार घेऊन भाजपच्या अस्तित्वाला लगाम घातला जाणार आहे. तर केंद्रातील सत्तेचा लाभ घेऊन या तिन्ही पक्षांच्या वाढत्या आकांक्षांना आवर घालण्याचे प्रयत्न भाजपचे राहणार आहेत. त्यातून सत्तेचे नवे मित्र झालेले शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सत्तेविना पोरका झालेला भाजपा यांच्यातील पश्चिम महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अटळ बनला आहे.

गेल्या पाच वर्षांत राज्य मंत्रिमंडळात द्वितीय स्थानी असलेले माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चार जिल्ह्यांत भाजपचे स्थान मजबूत केले. त्याचा लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला. पण विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेतील मतभेद वाढल्याने अपेक्षित यश पदरात पडले नाही. पाटील यांचे मंत्रिपद गेल्याने पूर्वीइतके महत्त्व राहिले नाही. केवळ प्रदेशाध्यक्ष असल्याने पश्चिम महाराष्ट्रात भाजपची अजूनही ताकद टिकून आहे हे दाखवून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. सर्वाना सोबत घेऊन सत्ता नसताना भाजपचे स्थान पूर्वीइतकेच बळकट असल्याचे दाखवून देणे हे सहजसोपे राहिलेले नाही. उलट या चारही जिल्ह्यांत भाजपच्या सत्तास्थानांना आव्हान देऊन भाजपची एक एक सत्तास्थाने काबीज करण्याच्या दृष्टीने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू झाले असून त्या दृष्टीने प्राथमिक हालचालींना गती आली आहे.