भाजी विक्रीच्या निमित्ताने दिवसा टेहळणी आणि रात्री घरफोडी करणाऱ्या दोन महिलांचा समावेश असलेल्या सराईत टोळीला शाहुवाडी पोलिसांनी पाठलाग करून अटक केले. सराईतानी शाहुवाडी, कडोली, पेठवडगांव परिसरातील घरफोडी, चोरीच्या १६ गुन्ह्यांची कबुली दिली. २० तोळे दागिने, रोकड असा सुमारे आठ लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. टोळीशी संबंधित असणाऱ्या इचलकरंजीतील आणखी दोघा सराईतांची नावे निष्पन्न झाली आहेत.

सराईत टोळीने शाहुवाडी,पन्हाळा व हातकणंगले तालुक्यात आठ महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे.घरफोडी,चोरीच्या गंभीर गुन्ह्यात संशयित प्रथमच पोलिस रेकॉर्डवर आल्याने त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.

टोळीची व्याप्तीही वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.गुन्ह्यातील २० तोळ्याचे दागिने, ८५ हजाराची रोकड,टेंपो,महागडा मोबाईल असा सुमारे ७ लाख ९० हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात शाहुवाडी पोलिसांना यश आले आहे,असेही ते म्हणाले.

अटक करण्यात आलेल्यात सागर जयवंत कदम (वय २९, रा.तळसंदे, ता. हातकणंगले) या म्होरक्यासह रेखा अर्जुन गोसावी (वय २८) व मंगल सुभाष गोसावी (वय ३९, रा. वडणगे,ता.करवीर) यांचा समावेश आहे.