“गायीचे पवित्र दूध आपणास व आपल्या मंत्री मंडळातील सर्व सहकाऱ्यांकरीता पाठवत आहोत. या पवित्र दुधाचे प्राशन करून न्याय बुद्धीने दुधाचे दर वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्याकडे गायीच्या दुधाच्या दरवाढीची मागणी केली. कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाउन असल्यामुळे प्रशासनाच्या आवाहनानुसार ई-मेलद्वारे हे निवेदन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना पाठवण्यात आले.

या निवेदनात आमदार पाटील म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांच्या संकटात दिवसेंदिवस भर पडत आहे. दुधाचे भाव कमी झाल्याने या संकटात अधिकच भर पडली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

महाराष्ट्रात गायी आणि म्हशीचे मिळून एकूण १ कोटी ४० लाख लिटर दूध संकलन होते. करोनाच्या लॉकडाउनच्या काळात दुधाच्या विक्रीमध्ये ३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दूध संघाकडून १५ ते १६ रुपये दराने दूध खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दूध २५ रुपये प्रतिलिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतू प्रत्यक्षात ७ लाख लिटर दूध खरेदी केले जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दूध संघांकडूनच शासन दूध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

त्यांपैकी ३५ लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केले जात आहे. ९० लाख लिटर दूध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जात आहे. १५ लाख लिटर दूध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दूध खरेदी केले जाते. त्यामुळे गाईच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान, दूध भुकटी करीता प्रतिकिलो ५० रुपये अनुदान, शासनाकडून तीस रुपये प्रतिलिटर दुधाची खरेदी करावी या मागण्यांसाठी एक ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाटील यांनी दिला.