निवडीने कोल्हापूरचे राजकीय वजन वाढले

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

‘आपण पोस्टाचे कोरे पाकीट आहोत, पक्ष चिकटवेल त्या ठिकाणी पोचू,’ असे विधान करणारे राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय पाकिटावर मंगळवारी ‘भाजप प्रदेशाध्यक्ष’ असा जबाबदारीचा नवा पत्ता टाकण्यात आला. या नव्या जबाबदारीमुळे चंद्रकांतदादांबरोबरच कोल्हापूरचेही राजकीय वजन वाढले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात रथी-महारथी होऊ न गेले, मात्र चंद्रकांत पाटील यांच्यासारखी राजकारणातील महत्त्वाची पदे मिळण्याचे भाग्य अद्याप कोणाच्या ललाटी आलेले नाही. १० जून १९५९ साली राजकारणाची पाश्र्वभूमी नसलेल्या मध्यमवर्गीय मराठा कुटुंबात जन्मलेल्या दादांनी स्वकर्तृत्वाने घेतलेली ही झेप विलक्षण आहे. त्यांचे वडील बच्चू पाटील हे मुंबईत गिरणी कामगार होते. सिद्धार्थ महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेल्या दादांनी १८ व्या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करायला सुरुवात केली. १९८२ साली त्यांची प्रदेश मंत्री तर १९८५ साली क्षेत्रीय संघटन मंत्री म्हणून निवड झाली. पुढील पाच वर्षांत ते अखिल भारतीय मंत्री म्हणून निवडले गेले. शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि युवा वर्गाचे प्रश्न यासंबंधी त्यांना संबोधित करत त्यांनी भारत पिंजून काढला. २००४ साली ते भाजपात सामील झाले. २०१३ साली ते पक्षाचे उपाध्यक्ष झाले आणि यंदाच्या जून महिन्यात वयाची साठी पूर्ण केलेले दादा आता प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापूरचे जावई. शहा यांचे निकटचे म्हणून चंद्रकांतदादा ओळखले जातात. आता दादा राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. जावईबापू देशाचे आणि भूमिपुत्र राज्याचे अध्यक्ष झाल्याने कोल्हापूरच्या भुजातील बळ वाढीस लागले असून देशाच्या राजकारणात कोल्हापूरचे महत्त्वही वाढीस लागले आहे.

आमदार, मंत्री आणि कोरे पाकीट 

जून २०१४ साली विधान परिषदेवर दादा निवडून गेले. राज्यात युतीची सत्ता दुसऱ्यांदा आल्यावर ते कॅबिनेट मंत्री झाले. पदार्पणातच त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, सहकार अशी महत्त्वाची खाती आली. जुलै २०१६ मध्ये ते महसूलमंत्री झाले. याचवर्षी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने पेट घेतला. मुख्यमंत्री बदलला जाणार असल्याच्या चर्चेला ऊ त आला, तेव्हाही पाटील यांनी संयतपणे उत्तर दिले. ‘पक्षात मी कोरे पाकीट आहे. वरिष्ठ जो पत्ता टाकतील तिथे जाऊ . गरज पडल्यास मी मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहायक देखील होईन,’ असे त्यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये प्रथम सांगितले होते. गतवर्षी जून महिन्यात कोल्हापुरात बोलताना पुन्हा एकवार त्यांनी ‘आपण पोस्टाचे कोरे पाकीट आहोत, पक्ष चिकटवेल त्या ठिकाणी पोचू,’ असे नमूद करत याबाबत पक्ष देईल तो आदेश पाळण्यास तत्पर असल्याचे स्पष्ट केले होते. आता पाटील यांच्या पाकिटावर प्रदेशाध्यक्ष पदाचा अत्यंत्य महत्त्वाचा पत्ता चिकटवला गेला असून या पातळीवर त्यांची कामगिरी आव्हानात्मक असली, तरी आव्हान स्वीकारायला त्यांनी दंड थोपटले आहेत.