करवीरनिवासिनी महालक्ष्मी देवीच्या गाभा-यात प्रवेश करणा-या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई व सहकारी महिलांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमित मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून, विविध सात प्रकारच्या कलमांचा समावेश आहे.
या दाखल झालेल्या गुन्ह्य़ात म्हटले आहे, की १३ एप्रिल रोजी रात्री तृप्ती देसाई व त्यांच्या सहकारी महिला कार्यकर्त्यांनी महालक्ष्मी मंदिरातील गाभा-यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना सामाजिक तसेच राष्ट्रवादी कार्यकत्रे असलेले जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर व इतरांनी प्रवेशासाठी विरोध करून धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या दिशेने हळद-कुंकू व शाई फेकून जीवितास व व्यक्तिगत सुरक्षिततेला धोका आणण्याची कृती केली. तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी सरकारी कर्तव्य बजावत असताना त्यांनाही कर्तव्य बजावण्यास अडथळा करून धक्काबुक्की केली. यामुळे फिर्यादी, पोलीस उपनिरीक्षक मस्के यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन शनिवारी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्याचा अहवाल न्यायालयाकडे सादर केला असून पुढील तपास जुना राजवाडा पोलीस करीत असल्याचेही सांगण्यात आले.