अबकारी कराच्या विरोधात सलग तीन दिवस सराफी दुकाने बंदचा प्रत्यक्ष परिणाम ग्राहकांवर होत असल्याचे शुक्रवारी दिसून आले. ग्राहक दुकाने बंद पाहून निराश होऊन परतत आहे, तर सराफही बंद कधी मागे घेण्यात येईल, याबाबत सांगू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. दरम्यान, गुजरी कॉर्नर येथे उद्या (ता. ५) तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. केंद्रीय अर्थसंकल्पात सराफ व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लागू केला आहे. त्याची अंमलबजावणीही लगेच सुरू केली आहे. त्याला विरोध करण्यासाठी जेम्स अँड ज्वेलरी या शिखर संघटनेच्या आदेशाने जिल्ह्यातील सराफ बाजार बुधवारपासून तीन दिवस बंद आहे. आज बंदचा तिसरा दिवस. यामुळे पूर्ण सराफ बाजारात शुकशुकाट जाणवत आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होत आहे. कारण निमित्ताने सोने खरेदीसाठी येणारा ग्राहक दुकाने बंद पाहून निराश मनाने परतत आहे. पूर्ण कुटुंबासह खेडय़ातून आलेल्या ग्राहकांची तर मोठी गरसोय होत आहे.

दरम्यान, बंद दुकानाच्या बाहेर एका बाजूला ग्राहक चर्चा करतात दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला व्यावसायिकही केंद्रीय पातळीवरील आंदोलनाची माहिती घेत उभे होते. व्यावसायिकांना आंदोलनाची माहिती देण्यात येऊन बंदविरोधी फलक हाती घेऊन घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, बाबा मडाडिक, कुलदीप गायकवाड, माणिक जैन, सुरेश ओसवाल, किरण गांधी, सुहास जाधव यांच्यासह हिम्मत ओसवाल, भूपेंद्र जैन, महेंद्र ओसवाल, किशोर परमार, मनोज राठोड, सुभाष पोतदार, बन्सी चिपडे आणि अनिल जामसांडेकर आदी उपस्थित होते.

सलग तीन दिवसांच्या बंदनंतर शनिवारी साप्ताहिक सुटी आणि रविवारी नेहमीप्रमाणे दुकाने सुरू होतील, या संभ्रमात ग्राहक आहेत. पण सराफ व्यावसायिकांचे पदाधिकारी जेम्स अँड ज्वेलर्स या शिखर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. पण त्यांनाही केंद्रीय मंत्री अथवा नेतेमंडळींकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे बंद कधी मागे घेण्यात येईल, याविषयी काहीही सांगता येत नाही, असे सांगण्यात आले.  गायकवाड आणि ओसवाल यांनी सांगितले, की केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शनिवारी (ता. ५) गुजरी कॉर्नर येथे तीव्र आंदोलन केले जाईल. त्यामध्ये व्यावसायिक बाजारपेठेत निषेध फेरी काढतील.