एनडीआरएफचे पथक दाखल, लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना

कोल्हापूर शहर व जिल्ह्यत शुक्रवारी पावसाची संततधार सुरू राहिल्याने पंचगंगा नदीचे पाणी वाढले असून ते इशारा पातळीकडे सरकू लागले आहे. जिल्ह्यच्या पूर्व भागाला पुराचा धोका जाणवू लागला असून शुक्रवारी हातकणंगलेचे तहसीलदार अविनाश भोसले यांनी पाण्याची पातळी धोकादायक पद्धतीने वाढणाऱ्या भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना तलाठय़ांना केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्यांदा एनडीआरएफच्या तुकडय़ा दाखल झाल्या आहेत .

कोल्हापूर जिल्ह्यत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. कोल्हापूरच्या पश्चिम घाट माथ्यावर अतिवृष्टी सुरू आहे. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा, शाहूवाडी परिसरात अतिवृष्टी झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यतील मुसळधार पाऊस आणि धरणातील विसर्गामुळे शिरोळ तालुक्यात नद्यांचे पाणी वाढत असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे आज चौथ्या दिवशीही कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊ स सुरू आहे. पंचगंगा नदीने आपली वाटचाल इशारा पातळीकडे सुरू ठेवली आहे. त्यामुळे कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यत  एनडीआरएफची तीन पथके दाखल झाली असून दोन शिरोळमध्ये तर एक कोल्हापुरात आहे. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पुराच्या पाण्यात पूर्णत: बुडाले आहे.

राधानगरी धरणाचे ३ दरवाजे अद्याप उघडेच आहेत. धरणातून ७ हजार ११२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. ६५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची पाणीपातळी जवळपास ३७ फुटांवर पोहोचली आहे.  कोकणाकडे जाणारा कोल्हापूर—गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यतील ४ राज्य मार्ग तर १५ प्रमुख जिल्हा मार्ग बंद करण्यात आले आहेत.