राज्य शासनाचे कर्जमाफीविरोधातील धोरण, शेतकऱ्यांना केलेल्या कर्जमाफी धोरणातील त्रुटी दूर कराव्यात, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी शनिवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकी निषेध रॅली काढून निदर्शने केली. कर्जमाफी धोरणातील गोंधळावर तोंडसुख घेत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सरकार विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

राज्यामध्ये सलग चार वर्षांमध्ये नसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक कर्जाची, शेती कर्जाची शेतकरी मुदतीत परतफेड करू शकले नाहीत. परिणामी, शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. सरसकट कर्जमाफीसाठी संप पुकारला होता. याची शासनाने दखल घेऊन शासनाकडून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, कर्जमाफी योजना व निकष शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरसोयीचे, अडचणीचे असल्याने व त्यामधील असणाऱ्या त्रुटींकडे  शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये  ऋतुराज पाटील, अंजना रेडेकर, सदाशिव चरापले, बजरंग पाटील, तौफिक मुलाणी, श्रीपती पाटील, भगवान पाटील, प्रदीप झांबरे, किरणसिंह पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत खोत यांच्यासह कार्यकत्रे दुचाकीवरून सहभागी झाले होते. या वेळी आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांचे मरण हेच धोरण असल्याची टीका केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीबरोबरच खावटी कर्जाचा या योजनेत समावेश करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपच्या मंत्रिपदाची खिल्ली उडवली

हल्ली कोणताही कार्यक्रम असला की पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापासून भाजप सरचिटणीस, आमदार सुरेश हाळवणकर  हे भाजपत आमंत्रित करून मंत्रिपदाचे आमिष दाखवत असतात. उद्या देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना मंत्रिपदाची ऑफर दिली तरी आश्चर्य वाटायला नको. मंत्रिपद राहो, साधे महामंडळाचे संचालक करणे यांना जमले नाही, अशा शब्दांत  सतेज पाटील यांनी  भाजपच्या मंत्रिपदाची खिल्ली उडवली.c