या वर्षीच्या उस गाळप हंगामात उसाला अंतिम दर प्रतिटन साडेतीन हजार रुपये मिळावा, अशी मागणी करत या मागणीकडे दुर्लक्ष  केल्यास ऐन दिवाळीत हातात दांडके घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, असा इशारा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष  शंकर गोडसे यांनी दिला.
या वर्षी उसाला प्रतिटन  २ हजार ५०० रुपये एफआरपीप्रमाणे एकरकमी पहिली उचल १४ दिवसांच्या आत द्यावी, ही उचल एकरकमी असावी अशी मागणी संघटनेने केली आहे. यासाठी ३० ऑक्टोबर रोजी तालिम संघाच्या मदानावर शेतकरी परिषद होणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली.
गोडसे पुढे म्हणाले, संघटनेचे नेते रघुनाथदादा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या परिषदेस समितीचे अध्यक्ष मिरजितसिंग मान, राष्ट्रीय सचिव चंगल रेड्डी, कर्नाटकचे शांताकुमार, आंध्रचे जगन्नाथ रेड्डी येणार आहेत. तूरडाळ, कांदा, उसाच्या प्रश्नावर या परिषदेत तोडगा काढला जाणार आहे. एकीकडे तुरीला कृषिमूल्य आयोग ४३ रुपये दर देते, तर देशात तुरीचा बाजारभाव २०० रुपयांवर आहे. आपल्याकडील कांद्याला दर देण्याऐवजी परदेशातून कांदा आणला जात आहे. त्याला ३६ रुपये दर दिला जात आहे. या प्रकारातून शेतकरी आíथक अडचणीत आला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी परिषदेत दिशा ठरवली जाणार आहे असेही गोडसे म्हणाले.