चंद्रकांत पाटील यांची कोटी

करवीरनगरीचे आकर्षण ठरलेल्या महालक्ष्मी देवीच्या सुवर्ण पालखी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनंत अडचणी आल्या असतानाही त्यावर मात करून, खासदार धनंजय महाडिक यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची भूमिका घेणाऱ्या महाडिकांना त्यांना आता केंद्रीय मंत्रिपद मिळाले पाहिजे, असे मत व्यक्त करतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सन २०१९ नंतर केंद्रीय मंत्रिपदाची त्यांची इच्छा पूर्णत्वास जाईल, अशी टिपणी केली. सोमवारी सायंकाळी पालखी हस्तांतरणाचा सोहळा भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला, त्या वेळी ते बोलत होते. हा सोहळा कोल्हापूरच्या इतिहासात अभूतपूर्व असा ठरला.

साडेतीन शक्तिपीठांपकी पूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीसाठी सुवर्ण पालखी असावी, असा संकल्प खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सोडण्यात आला. दोन वर्षांत २६ किलो वजनाची सुवर्ण पालखी आकाराला आली. या सुवर्ण पालखीचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे हस्तांतरण सोहळा, सोमवारी सायंकाळी झाला. सुवर्ण पालखीच्या हस्तांतरणाच्या सोहळ्यासाठी तामिळनाडू इथल्या कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामीजी, करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती स्वामीजी, आंध्र प्रदेशातील मंत्रालयम येथील राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधीश श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामीजी या तीन महनीय सद्पुरुषांची उपस्थिती लाभली. त्यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार अमल महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, अरुंधती महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, ट्रस्टचे उपाध्यक्ष योगेश जाधव, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, पृथ्वीराज महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार महाडिक यांच्या हस्ते तिन्ही पीठांच्या शंकराचार्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. श्री जयेंद्र सरस्वती स्वामीजी, श्री विद्यानृसिंह भारती स्वामीजी, श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामीजी यांनी, सुवर्ण पालखीचा प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल करवीरच्या जनतेला शुभाशीर्वाद दिले. प्रास्ताविकात ट्रस्टचे अध्यक्ष खासदार महाडिक यांनी देवस्थान समितीने आता पालखीची काळजी आणि देखभाल करावी, असं मत व्यक्त केलं. तिन्ही पीठांच्या मठाधीशांच्या हस्ते, श्री महालक्ष्मीची सुवर्ण पालखी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं विधिपूर्वक सुपूर्द करण्यात आली. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सुवर्ण पालखी दस्तऐवज हस्तांतरित करण्यात आले.