28 October 2020

News Flash

‘गोकुळ’ बहुराज्य करण्यावरून विरोधकांचा कांगावा

गोकुळ दूध संघ बहुराज्य करण्याच्या विषयावरून गेले दोन  महिने सत्ताधारी आणि विरोधकात वाद सुरु आहे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पी. एन. पाटील यांचा आरोप

कोल्हापूर : गोकुळ संघाचं दूध संकलन वाढवण्यासाठी, उत्पादक आणि संघाच्या हितासाठी ‘गोकुळ’ बहुराज्य करण्याची गरज आहे. विरोधक केवळ दिशाभूल करून बहुराज्यबद्दल गैरसमज पसरवत आहेत.  त्यांनी ‘गोकुळ’बद्दल आम्हाला विचारण्यापेक्षा आपल्या काकांना विचारावे,  असा टोला माजी आमदार पी. एन. पाटील यांनी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांना शुक्रवारी येथे लगावला.

गोकुळ दूध संघ बहुराज्य करण्याच्या विषयावरून गेले दोन  महिने सत्ताधारी आणि विरोधकात वाद सुरु आहे. बहुराज्य करण्याला आमदार सतेज पाटील यांनी कडाडून विरोध केला असून रविवारी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनीही विरोधात उडी घेतली. तेव्हा नरके यांनी आपले राजकीय विरोधक पी. एन. पाटील यांच्यावर टीका केली होती.

त्यानंतर आज जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी बहुराज्यच्या समर्थनार्थ आपली बाजू मांडण्यासाठी कार्यकर्त्यांंचा मेळावा आयोजित केला होता . या वेळी पाटील यांनी दूध उत्पादकांच्या हितासाठीच आपण संघ बहुराज्य करत असल्याचे सांगत आमदार नरके यांच्यावर  ‘नरके थापा मारत आहेत , ते खोटय़ा शपथा घेतात ,ते मनोरुग्ण आहेत’ असा जोरदार हल्ला चढवला.

मेळाव्यात गोकु ळपेक्षा चर्चा विधानसभेचीच होती हे चित्र पहायला मिळाले.गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे,  पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी,  प्रा. टी. एल. पाटील, बुधिराज पाटील, जयसिंग पाटील, भगवान लोंढे, जयसिंग हिरडेकर यांनी  मनोगत व्यक्त केले.

बहुराज्यचा घाट घातला

राजकारणात शब्दाचा वापर जपून करायचा असतो. अर्थाचे पदर माहित असावे लागतात. अन्यथा शब्दफेक करणऱ्याचीच हुर्यो उडते. अशीच अनवस्था आज  गोकु ळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांच्यावर ओढवली. बहुराज्यचे समर्थन करण्याच्या प्रयत्नात त्यांनी, ‘ दूध संकलन वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. त्यामुळं संघ बहुराज्य करण्याचा ‘घाट घातला आहे’ असा शब्दप्रयोग केला. एकदा नव्हे तर तीन वेळा  ‘घाट घातला’ असा शब्दोच्चार त्यांनी केला. गेल्या आठवडय़ात सातवी उत्तीर्ण असल्याच्या मुद्दावरून विश्वास पाटील यांच्यावर विरोधकांनी चिमटे काढले होते, तर आज ते स्वत:च चुकीचा शब्दप्रयोग करत पुन्हा अडचणीत सापडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2018 4:24 am

Web Title: dispute between the ruling and opposition in gokul milk union
Next Stories
1 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास अटक
2 ऊस हंगामापूर्वीच संघर्षांचे वारे
3 अपंगांच्या विकासासाठी मदतीच्या हातांची गरज!
Just Now!
X