लग्नानंतर कौमार्य परीक्षा घेत एका विवाहितेस माहेरी पाठवण्याचा तसेच यानंतर जातपंचायत बसवत घटस्फोट घडवून आणण्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी बेळगाव येथील नऊ जणांविरुद्ध कोल्हापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर येथील कंजारभाट समाजात दोन सख्ख्या बहिणींचा विवाह बेळगाव येथील दोन तरुणांशी गेल्या वर्षी झाला होता. लग्नानंतर या समाजात कौमार्य परीक्षा घेतली जाते. या प्रकारालाच सामोरे गेलेल्या या बहिणींपैकी एकीस सासरच्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर संबंधित दोघीही बहिणींना कोल्हापुरातील त्यांच्या घरी पाठवून देण्यात आले. शिवाय कोल्हापूर येथे राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील एका मंदिरात जात पंचायत बसवून त्यांचा जातीअंतर्गत घटस्फोट देण्यात आला.

दरम्यान, या अन्यायाविरुद्ध या दोघी बहिणींनी येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पत्र लिहिल्यावर या प्रकारास वाचा फुटली. यानंतर कोल्हापुरात ‘अंनिस’चे कार्यकार्ये आणि दोन्ही पीडित बहिणींनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली आहे.