दयानंद लिपारे

करोना संसर्ग कमी होऊ लागल्यानंतर वस्त्रोद्योग बाजारपेठेतही थोडी सुधारणा दिसू लागली आहे. दिवाळीच्या सर्वात मोठय़ा हंगामामध्ये कापड विक्री चांगल्या प्रकारे होण्याच्या आशेचे दीप उजळले आहेत. त्यामुळे देशभरातून कापड, तयार कपडे यांना मागणी वाढली आहे. कापड उत्पादन निर्मितीतही वाढ झाली आहे. मात्र त्याच वेळी सूत दरात होणाऱ्या वाढीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

करोना संसर्ग सुरू झाल्यानंतर वस्त्रोद्योगात कमालीची मरगळ निर्माण झाली होती. एप्रिल महिन्यापासून व्यवहार जवळपास ठप्प झाले होते. परप्रांतीय कामगार गावी निघून गेल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली होती. टाळेबंदीमुळे उद्योगाची चक्रे बराच काळ बंद होती. कच्च्या मालाची उपलब्धता आणि पक्क्या मालाची बाजारपेठेत विपणन होण्यामध्येही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मुख्य म्हणजे किरकोळ विक्रीची दुकाने बंद असल्यामुळे मागणीही ठप्प झाली होती. अशा अनेक अडचणीमध्ये वस्त्रोद्योग याचा गुंता निर्माण झाला होता.

सणासुदीला तेजीची अपेक्षा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कापडाच्या बाजारपेठेमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. दिवाळी हा कापड विक्रीसाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा हंगाम मानला जातो. घरोघरी दिवाळीनिमित्त कपडय़ांची प्रत्येक व्यक्तीकडून व्यक्तीसाठी खरेदी हमखासपणे केली जाते. शर्टिग, शूटिंग, साडय़ा, महिलांचे वस्त्रप्रावरणे, लहान मुलांसाठी विविध प्रकारची कपडे यांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. वर्षभराच्या व्यवहाराच्या तुलनेत त्याची विक्रीही धूमधडाक्यात  होत असते. दरवर्षी होणाऱ्या विक्रीच्या तुलनेत यंदा यंदा घटली आहे. नेहमीची तेजीची उधळण दिसत नाही. तथापि गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढल्याने आणि कपडय़ांची खरेदीला वेग आला आहे. कापड मागणीची नोंदणी वाढल्याने समाधानकारक चित्र दिसत आहे. दरवर्षी दिवाळीत चांगली कापड विक्री होत असली तरी यंदा त्या तुलनेत ५० टक्के उलाढाल आहे. करोनाच्या सहा महिने मंदावलेल्या स्थितीच्या तुलनेत ही स्थिती उमेद वाढवणारी आहे, असे पॉवरलूम अँड यार्न र्मचटस असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

अजूनही बाजारातील करोनामुळे निर्माण झालेली नकारात्मक मानसिकता पूर्णत: संपलेली नाही. प्रत्यक्ष व्यवहार होत नाहीत. सारे व्यवहार ऑनलाइन पद्धतीनेच होत असल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. कापड विक्रीची देयके महानगरातील व्यापाऱ्यांकडून प्राप्त होत नाहीत. त्यांच्याकडे कोटय़वधी रुपये अडकून पडले आहेत. त्यामुळे सावधानतेने व्यवहार केले जात असल्याचे कापड विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

तेजीमंदीची चिंता

गेल्या महिन्याभरापासून वस्त्रोद्योग पूर्वपदावर येऊ लागला आहे. यंत्रमाग कारखाने, सायझिंग, कापड प्रक्रिया उद्योग, गारमेंट, सूतगिरणी अशा बहुतेक सर्व क्षेत्रांतील व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. करोनात गारठलेले व्यवहार ७५ ते १०० टक्के पूर्वपदावर आल्याचे सुचिन्ह आहे. मात्र याच वेळी सुताच्या दरांमध्ये वाढ होऊ लागल्याने चिंता निर्माण झाली आहे. ‘सुताच्या दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. सूतदरात एकतर्फी वाढ होत असताना कापड विक्रीला त्या तुलनेने दर मिळत नसल्याने यंत्रमाग धारकांचे अर्थकारण ऐन दिवाळीत बिघडले आहे. वीज दरवाढ, व्याज दर सवलत प्रश्न प्रलंबित असताना या वर्षी निम्मा काळ बंद स्थितीत घालवावा लागला असताना कामगारांना बोनसची रक्कम कशी द्यायची याची विवंचना उद्योजकांना आहे’, असे इचलकरंजी पॉवरलूम व्हिवर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी सांगितले.

कापडाची देयके वेळेत मिळण्याच्या उपक्रमाला (पेमेंटधारा) प्रतिसाद चांगला आहे. वेळेवर देयके मिळू लागल्याने व्यवहार करणे सुलभ झाले आहे. त्यात अजूनही काही त्रुटी दिसत असून त्या दूर करण्यासाठी संबंधितांकडे यंत्रमागधारक संघटना प्रयत्न करीत असल्याचेही यंत्रमागधारक सांगतात.