आवाडे-कोरे यांच्यासाठी भाजप तसेच महाविकास आघाडीचे प्रयत्न

दयानंद लिपारे, लोकसत्ता

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर
Blood donation by AAP
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे रक्तदान

कोल्हापूर : महापालिकेसह महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रबळ राजकीय ताकद मागे रहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप यांनी जिल्ह्य़ातील प्रमुख नेत्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यातून विनय कोरे व प्रकाश आवाडे या दोन्ही माजी मंत्र्यांना आपल्याकडे ओढण्याची रस्सीखेच सुरू आहे. विरोधी पक्षनेचे देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात सहकारात मोठी ताकद असलेल्या दोन्ही आमदारांना पक्षात घेण्याचा प्रयत्न झाला. लगेच दुसऱ्या दिवशी सत्तारूढ महाविकास आघाडीने हे दोन्ही नेते आपल्यासोबत राहतील असा प्रयत्न सुरू असल्याचे विधान केले. अशातच या दोन्ही नेत्यांच्या भूमिका तळ्यात-मळ्यात असल्याने राजकीय संभ्रमावस्था वाढत चालली आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ाची राजकीय परिस्थिती विधानसभा निवडणुकीनंतर बदलली आहे. गेल्या विधानसभेत जिल्ह्य़ात शिवसेनेचे सहा आमदार होते; आता एकच उरला आहे. एकही जागा नसलेल्या काँग्रेसचे पाच आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. तर पूर्वी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस असलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर शिवसेनेत जाऊन राज्यमंत्री  झाले. महाविकास आघाडी जिल्ह्य़ाच्या राजकारणात प्रभावी ठरली आहे. भाजपची गेल्या पाच वर्षांची ताकद आता बरीच क्षीण झाल्याने बेरेजेच्या राजकारणाला गती दिली आहे.

भाजपची जुळवाजुळव

सध्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे पडघम वाजत आहे. पाठोपाठ गोकुळ दूध संघ, कोल्हापूर मध्यवर्ती बँक, बाजार समिती, शेतकरी संघ अशा महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यातून आपल्या गोटात अधिक मातब्बर राजकीय घराणी असावीत असा प्रयत्न सुरू आहे. विधानसभेवेळी ‘जनसुराज्य’चे विनय कोरे भाजपसोबत होते. निवडणुकीनंतर प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. याच वेळी जिल्ह्य़ातील सहकारी संस्थांच्या राजकारणात या दोघांचे विकास आघाडीच्या नेत्यांशीही सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत ही द्वयी कोणासोबत राहणार याविषयीची उत्सुकता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यात चंद्रकात पाटील यांच्यासमवेत कोरे व आवाडे यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते भाजपसोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महाडिक, समरजीत घाटगे यांच्याप्रमाणे या दोहोंची सक्रियता वाढावी असा प्रयत्न आहे. राज्यसभेत वर्णी लागलेले संभाजीराजे छत्रपती यांचाही निवडणूक मोहिमेत सहभाग वाढवावा, असा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याने तसाही प्रयत्न होत आहे.

महाविकास आघाडीच्या हालचाली

महाविकास आघाडीचे नेते सक्रिय झाले आहेत. गृह राज्यमंत्री व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आवाडे व कोरे आपल्यासोबत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.’ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांचे काँग्रेसशी पाच दशकांचे संबंध असल्याने त्यांना काँग्रेस पक्षात आणण्याची जबाबदारी आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे सोपवली आहे. त्यात काँग्रेसला यश येईल’, असा त्यांनी दावा केला आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी कोरे यांची मदत मिळवण्यात येईल, असेही त्यांचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे मंत्री पाटील यांच्या दृष्टीने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी या दोन्ही नेत्यांची मदत खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे राजकीय नसेल तर किमान सहकाराच्या पातळीवरील तरी या दोघांनी आपल्यासोबत राहावे, अशी त्यांची व्यूहरचना दिसते.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘कोरे आपले मित्र आहेत. पण त्यांच्याशी राजकीय संवाद झाला नाही’, असे म्हणत राजकीय सहकार्यासाठी मैत्रीचा हात पुढे केलेला लपून राहिला नाही. या घडामोडी सुरू असताना कोरे-आवाडे यांनी थेट राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. दोघांनाही केंद्रातील भाजप आणि दुसरीकडे राज्यातील आघाडी खुणावत आहे. सहकारी संस्थांच्या मदतीसाठी दोन्ही सरकारे मदत करू शकतात, असे त्यांचे निरीक्षण आहे. यापैकी कोणा एकाची कायमची सोबत करावी, यावरून दोन्ही नेते संभ्रमावस्थेत आहेत.

शिवसेनेची नाराजी

जिल्ह्य़ात काँग्रेस – राष्ट्रवादीचे नेते कोरे- आवाडे यांच्याशी हातमिळवणीच्या प्रयत्नात असले तरी यापासून शिवसेना फटकून आहे. पन्हाळा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांचा कोरे यांनी पराभव केला असला तरी त्याला काँग्रेसच्या नेत्यांची साथ मिळाल्याचे शिवसैनिक सांगतात. परिणामी, कोरे यांना सोबत घेऊ नये,अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे. इचलकरंजीत यंत्रमागाच्या प्रश्नावरून आवाडे यांनी आघाडी सरकारच्या निष्क्रियतेचा पाढा वाचल्याने त्यांनी आयोजित बैठकीकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवली. त्यामुळे उभय काँग्रेसचे नेते कोरे – आवाडे यांच्याशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेत असल्याने शिवसेनेची नाराजी महाविकास आघाडीच्या ऐक्यावर परिणाम करण्याची चिन्हे आहेत.