|| दयानंद लिपारे

आमच्या सत्ताकाळात विकासकामांचा डोंगर उभा राहिला, विरोधकांना धड एक वीटही नव्याने लावता आली नाही, अशी टीकाटिप्पणी राजकारणात नेहमीच चाललेली. याच्याही पुढे जात विकासकामांसाठी भरघोस निधी आणल्यास सत्कार करू, असे आव्हान देण्यास कमी केले जात नाही. पण या साऱ्याच्या पुढे जात कोल्हापुरात विकासकामासाठी  ‘निधी, हत्ती आणि ऐरावत’ असा आव्हानांचा सामना रंगत आला आहे. विकासाच्या नावाखाली येणारा, आणला जाणारा कोटय़वधींचा निधी आणि त्यावरून चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ- सतेज पाटील या आजी-माजी मंत्र्यातील रंगलेला आखाडा पाहून सामान्य जनता अचंबित झाली आहे.

या वादाला किनार आहे ती राजकारणाचीच. कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेला खिंडार पाडून कमळ फुलवण्याची इच्छा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा व्यक्त केली. त्यावर महापालिकेतील काँग्रेसचे कारभारी पत्रक काढून पालकमंत्री पाटील यांनी शहर- जिल्ह्य़ाच्या विकासाला कोणता हातभार लावला, असा टीकेचा सूर आळवत होते. पण, मंत्री पाटील यांनी फांद्या तोडण्यापेक्षा थेट बुंध्यावर घाव घालण्याचे धोरण अवलंबले.

पाटील यांनी आपण राक्षस असून झोपलेल्या राक्षसाला जाग करू नका, आपण महसूलमंत्री असून, बलाढय़ मंत्री आहे, असे सांगत शहरातील भूखंडाचे आरक्षणे उठवून जमिनी लाटल्या आहेत अशांची चौकशी करू, असा इशारा दिला होता. तो इशारा होता काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना उद्देशून होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी, चंद्रकांत पाटील यांनी दबावाचे राजकारण करण्याऐवजी शहराच्या विकासासाठी ५०० कोटींचा निधी दिल्यास त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे आवाहन केले होते. आमची सत्ता असताना १३०० कोटींचा निधी आणला; विद्यमान सरकारने निधी दिलेला नाही, अशी टिपण्णीही त्यांनी केली होती.

राज्य मंत्रिमंडळात द्वितीयस्थानी असलेल्या महसूलमंत्र्यांच्या लेखी ५०० कोटी ही रक्कम नगण्यच ठरली. त्यांनी तसे बोलूनही दाखवले. मंत्री झाल्यापासून कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्य़ात तब्बल सहा हजार कोटींचा निधी विकासकामांसाठी आणला आहे. त्यामुळे एका नव्हे तर सहा हत्तींवरून आपली मिरवणूक काढावी, असा टोला मंत्री पाटील यांनी सतेज पाटील यांना लगावला. जनतेच्या भल्यासाठी करता आलेल्या या सेवेबद्दल विनयपूर्वक या मिरवणुकीचा स्वीकार करू, असा चिमटाही आजी मंत्र्यांनी माजी मंत्र्यांना काढला. विकासकामांचे हे आव्हान- प्रतिआव्हान इथेच संपेल असे वाटत होते, पण सतेज पाटील यांना या अडचणीच्यावेळी हात देण्यास माजी जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ धावले आहेत. पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा नियोजनसह जिल्ह्य़ातील  सर्व खात्यांकडून आलेल्या निधीची आकडेवारी जाहीर केली असून त्याआधारे ते  हत्तीवरून मिरवणूक काढा, असा सल्ला दिला. मात्र मंत्री पाटील यांनी गृहीत धरलेला हिशेब मी व सतेज पाटील यांच्या सत्ताकाळाशी जोडला तर  हा निधी पाहून मंत्री पाटील यांना आमच्या दोघांची मिरवणूक काढण्यासाठी इंद्राचा ऐरावत आणावा लागेल,’ असा प्रहार मुश्रीफ यांनी केला आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात दरवर्षी दीड हजार कोटींचा निधी आणत होतो, अशी पुस्ती जोडत मुश्रीफ यांनी भाजपच्या काळात पुरेसा निधी मिळत नाही, अशी टिप्पणीही केली. तूर्तास हे निधी, हत्ती, ऐरावत  प्रकरण याच मुक्कामावर थांबले आहे. याला आजी मंत्री कोणते उत्तर देणार त्यावर माजी मंत्री काय म्हणत राहणार हा राजकारणाचा भाग असला तरी सामान्य जनता मात्र विकासाची गंगा कोणाच्या काळात वाहत राहिली यावर बारीक लक्ष ठेवून असून त्याचा निर्णायक कौल निवडणुकीत दिसणार हे मात्र निश्चित.