ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीच्या ८० टक्के रक्कम देण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी घेतला आहे. रेणुका-पंचगंगा साखर कारखान्याने प्रतिटन २०४० रुपये देणार असल्याचे परिपत्रक मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे सुपूर्द केले. यामुळे शेतकऱ्यांना या हंगामातील ऊस बिले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १५ डिसेंबरपर्यंतची बिले अदा केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन २ महिने झाले तरी शेतकऱ्यांना उसाची बिले मिळाली नव्हती. एफआरपी कायद्यानुसार १४ दिवसांत बिले मिळणे बंधनकारक असताना त्याकडे दुर्लक्ष झाले होते. साखर कारखान्यांनी आíथक टंचाईचे कारण पुढे केले होते. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांकडे बठक झाल्यानंतर ८०-२० टक्के प्रमाणे एफआरपी देण्यात यावी, असा निर्णय झाला. मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या सोमवारपासून आंदोलन सुरु केले होते. ४ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एक बठक घेऊन एफआरपीची ८० टक्के रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, याबाबतचे पत्र कारखाना व्यवस्थापनाकडून मिळत नाही तोपर्यंत ऊस वाहतूक रोखून धरण्याची भूमिका स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतली. अखेर कारखाना व्यवस्थापकांना याबाबतचे पत्र संघटनेच्या कार्यकर्त्यांना देणे भाग पडले. आतापर्यंत जिल्ह्यातील बहुतेक कारखान्यांनी अशी पत्रे दिली आहेत. या मालेत रेणुका-पंचगंगा कारखाना मागे होता. पण या कारखान्यानेही याबाबतचे पत्र दिल्याने ऊसदराची कोंडी फुटली आहे.