दयानंद लिपारे

गेल्या दोन दिवसांत दूध दरवाढीवरून राज्यात आंदोलनाचा भडका उडाला. सत्तेतील पक्षांसह विरोधकांनीही या आंदोलनात भाग घेत अनेक ठिकाणी वाहनांची मोडतोड, दूध ओतून देणे असे प्रकार घडल्याने त्यावरून टीकेचे वादळ उठले. मात्र या सर्व संघटनांनी आंदोलन करण्यासाठी नेमका या आठवडय़ातच मुहूर्त का साधला, याचे उत्तर एका शासकीय पत्रात दडले आहे.

पशुसंवर्धन विभागाने याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचा सांगावा आठवडाभर आधी धाडला आणि ते पत्र हाती पडताच सर्व शेतकरी संघटनांना जाग येऊन आंदोलनाची ललकारी दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

खासगी व सहकारी दूध संघामार्फत कमी भावाने दूध खरेदी करण्यात येत असल्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात २१ जुलै रोजी दुपारी बैठक आयोजित केल्याचे असे पत्र उपसचिव राजेश गोविंद यांनी १६ जुलै रोजी राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, अजित नवले, विठ्ठल पवार तसेच महानंद, गोकुळ, चितळे, पराग या सहकारी व खासगी दूध संस्थांना पाठवले होते.

बैठकीचा सुगावा लागल्यानंतर सर्व शेतकरी संघटनांनी पोटतिडिकीने म्हणणे मांडण्यास सुरुवात केली. सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाची घोषणा केली. दूध दरात पहिल्यांदाच उडी घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शासनावर व राजू शेट्टींवर टीका केली. रघुनाथदादा पाटील यांनीही याविरोधात आवाज उठवला.