कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने या उत्साहात बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढणे व्यापाऱ्यांच्या अंगलट आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष, राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांच्यासह १३ व्यापाऱ्यांवर मंगळवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पाच दिवसांचा अपवाद वगळता सुमारे तीन महिने दुकाने बंद होती. जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. याचा आनंद साजरा करण्यासाठी राजारामपुरी येथे बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढली. या बैलगाडीत गांधी हे व्यापारी, नागरिकांना अभिवादन करत होते. अन्य व्यापारी ‘करोना नियमावलीचे पालन करावे’ असे प्रबोधन फलक घेऊन चालत जात होते.

आज सामाजिक कार्यकर्ते बाबा इंदुलकर व अशोक देसाई यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली. रस्त्यावरील किरकोळ व्यापाऱ्यांनी नियम भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र, धनदांडग्यांवर कारवाई का केली जात नाही, अशी विचारणा केली होती.

त्यानंतर सूत्रे हलली आणि करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्यावरून गुन्हा दाखल केला. अशाप्रकारे प्रसिद्धीचा सोस गांधी यांच्यासह व्यापाऱ्यांना गुन्हा दाखल होण्यापर्यंत घेऊन गेला.

तर पुन्हा निर्बंध

कोल्हापूर जिल्हा करोना नियमावलीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. कोविड विषयक सर्व काळजी नागरिक, व्यापारी, उद्योजक, कामगार यांनी काळजी घ्यावी. परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसले नाही तर पुन्हा जिल्ह्यात कडक टाळेबंदीचे नियम लागू करावे लागतील, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी मंगळवारी सांगितले.