तारदाळ (ता. हातकणंगले) येथील दोन अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्यास मंगळवारी आग लागली. या आगीमध्ये सुमारे ३ कोटीचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगितले जाते.
तारदाळ येथे प्रणिती यंत्रमाग सहकारी संस्था आहे. या संस्थेतील अत्याधुनिक अशा यंत्रमाग कारखान्याला मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आग लागली. मागावरील कापड, सूत या ज्वलनशील घटकांमुळे आग क्षणार्धात भडकली. एकापाठोपाठ एक सर्वच अत्याधुनिक यंत्रमागावरील सूत, विणलेल्या कापडाला आग लागली. कारखान्यातील इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक साहित्य, मशिनरी, कापडाचे तागे आदी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
आग लागल्याचे पाहून काम करणारे कर्मचारी ओरडत कारखान्याबाहेर आले तर काहींनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरपालिका अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीची व्याप्ती मोठी असल्याने आणखी एका बंबास पाचारण करावे लागले. दोन्ही बंबावरील कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. ही आग शॉर्टसर्किट लागल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण खामकर यांनी सांगितले. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या वस्तू पाहता सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, तारदाळ येथील श्रीरामनगरमध्ये असलेल्या लखन दायमा यांच्या यंत्रमाग कारखान्यालाही पहाटेच्या सुमारास आग लागली. यामध्येही इलेक्ट्रिक साहित्य, मशिनरी, कापड असा सुमारे २५ लाखाचे नुकसान झाले. दोन्ही ठिकाणी शहापूर पोलिसांनी पंचनामा केला.