कोल्हापूर : तीन आठवडय़ांपासून पासून उन्हाचा तडाखा वाढत चालला असताना गुरुवारी दुपारी ढगाळ वातावरणानंतर जिल्ह्यत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. शहर परिसरात जवळपास पाऊण तास परतीचा पाऊस धिंगाणा घालत होता. सायंकाळी जिल्ह्यतील काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या महिन्यात पावसाने जवळपास रोजच हजेरी लावली होती. नदी, धरणांच्या पाणीसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. शेतात पाणी साचून राहिल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ  लागली होती. मात्र, गेले तीन आठवडे चित्र पूर्णत: बदलले आहे. सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा कडाका जाणवू लागला होता. उगवलेल्या पिकांना पाण्याची गरज भासू लागली होती. तर, दुसरीकडे कृष्णी-पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मोठय़ा श्रींचे विसर्जन कसे करायचे याचा पेच गणेश मंडळांना पडला होता.

पावसाची गरज भासत असतानाच आज दुपारी वरुणराजा प्रसन्न झाला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आकाशात काळय़ा ढगांची गर्दी झाली. पाठोपाठ मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पूर्वेकडून आलेल्या या पावसामुळे ताराबाई पार्क, नागाळा पार्क, कसबा बावडा, मार्केट यार्ड,  दसरा चौक , दाभोलकर कॉर्नर आदी मध्यवस्ती भागासह उपनगरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गारवा निर्माण झाला होता. शहरातील सर्व रस्ते जलमय झाले होते.

शेतकरी आनंदित

पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची कळी भलतीच खुलली. पिके हातातून जाण्याचा धोका असताना पावसाची कृपा झाल्याचा आनंद बळीराजाच्या बोलण्यातून दिसत होता. या पावसामुळे  तापमान तात्पुरते कमी होईल, परंतु आगामी आठवडय़ापासून तापमानात परत वाढ होईल आणि उष्णता जाणवेल. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain with thundershowers in kolhapur
First published on: 21-09-2018 at 02:42 IST