कोल्हापूर : कोल्हापूर शहरात श्रावणसरी बरसत असल्या तरी पश्चिम भागातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे मंगळवारी येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ४ फुटांनी वाढ झाली. नदीचे पाणी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडले आहे. धरणातील विसर्ग वाढला आहे.  जिल्ह्यत २८ बंधारे पाण्याखाली गेले असून त्यावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे.

गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. श्रावण महिना सुरु झाल्यावर पावसाने पुन्हा एकदा अंग धरले आहे. कोल्हापूर शहरात दिवसभर अधून मधून पावसाच्या सरी  बरसत असतात. मात्र पश्चिम भागातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी धरणातील पाण्याच्या साठय़ामध्ये लक्षणीय वाढ झाली असून विसर्ग वाढला आहे. सर्वात मोठय़ा दूधगंगा धरणात काल  ६ हजार क्युसेक असणारा विसर्ग आज आणखी वाढला आहे. आता तो ७५०० क्युसेक झाला आहे . तर , शाहूकालीन राधानगरी धरणातून ३६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. या धरणाचे ३ व ६ क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

पावसाची संततधार कायम असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.  पंचगंगा नदीवरील येथील राजाराम बंधाऱ्याच्या  पाणी पातळीत ४ फुटांनी वाढ झाली. नदीचे पाणी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडले आहे. याचबरोबर  जिल्ह्यत २८ बंधारे पाण्याखाली गेले असून त्यावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे.