राधानगरी धरणातून पुन्हा विसर्ग सुरू

कोल्हापूर : गेल्या २४ तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. धरण भागात पावसाचा धुमाकूळ सुरु असल्याने धरण, नदीमधील पाणीसाठा  वाढला आहे. राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले असून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पावसाची जोर पाहता भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क तेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर शहर आणि पूर्वेकडील भागात मात्र पावसाच्या हलक्या सरी अधून मधून बरसत राहिल्या .

कोल्हापूर जिल्ह्यात गत  महिन्यात याच कालावधीत पावसाचा जोर वाढला होता. १० दिवस पावसाचा अहोरात्र धुमाकूळ सुरु राहिल्याने जिल्ह्यातील सर्व नद्यांना महापूर आला होता. पुराचे पाणी आता कोठे ओसरले असताना पुन्हा पावसाने जोर धरला आहे.

विशेषत: कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगराळ भागात पावसाची गती आहे. मागच्या २४ तासांपासून या भागात पावसाचा जोर वाढलेला आहे.  मुसळधार पाऊ स कोसळत असल्याने जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणीपातळीमध्ये हळूहळू पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे.

राधानगरीचे दरवाजे उघडले

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे चार दरवाजे दरवाजा उघडले आहेत. धरणातून सध्या प्रतिसेकंद हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून यामुळे भोगावती नदीची पाणीपातळी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क तेचा इशारा दिला आहे.

पुढील चोवीस तास पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी आज २२  फू ट असून, १२ बंधारे पाण्याखाली आहेत.

चिकोत्रा मध्यम प्रकल्प आज सकाळी ६ वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे,अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी बुधवारी दिली.