पंचगंगेच्या पातळीत दिवसात दुप्पट वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यत पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. गुरुवारी जिल्ह्यच्या सर्व भागात जोरदार मुसळधार पाऊस पडला. राधानगरी तालुक्यात जोरदार पावसामुळे ओढय़ावरील पर्यायी पुलाचा भराव वाहून गेला. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत २४ तासांत दुप्पट वाढ झाली असून ५५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर शहरात सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत राहिला. जोरदार पावसामुळे संपूर्ण शहरात पाणी साचले होते. कोल्हापुरात पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा रात्री पाण्याखाली गेला होता.

शहरात पंचगंगा नदीची काल सायंकाळी चार वाजता पाणीपातळी चौदा फूट होती. एकही बंधारा पाण्याखाली गेला नव्हता. २४ तासांत पाणीपातळी जवळपास दुप्पट वाढली आहे.

आज याच वेळेस नदीची पाणीपातळी ३० फूट ३ इंच होती, तर ५५ बंधारे पाण्याखाली गेले होते. नदीची इशारापातळी ३९ फूट असून धोका पातळी ४३ फूट आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत चालली आहे.

पावसाळी पर्यटन

जिल्ह्यच्या ग्रामीण भागांमध्येही सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने अन्य नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. धबधबे वाहू लागले असून वर्षां पर्यटनासाठी पावले वळू लागली आहेत. करोनामुळे निर्बंध असतानाही उत्साही पर्यटक धबधब्याचा आनंद लुटत आहेत. राऊतवाडी येथील धबधबा दरवर्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. आज तेथेही पर्यटकांनी हजेरी लावली.

पुलाचा भराव वाहून गेला

कोल्हापूर-गारगोटी मार्गावर माजगाव-चंद्रे दरम्यान एक ओढा आहे. तेथे नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्याला लगतच पर्यायी रस्ता केला आहे. या रस्त्याचा भराव पहिल्याच जोरदार पावसामुळे तो वाहून गेला. सुमारे १५ फूट अंतराचे भगदाड रस्त्याला पडले आहे. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक खंडित झाली आहे. येथील दैनंदिन व्यवहार व्यवहारांवर मर्यादा आल्या आहेत. बिद्री सहकारी साखर कारखान्याजवळ राधानगरी तालुक्यात चंद्रे गाव आहे.