जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. सकाळी आणि सायंकाळी मुसळधार पावसाने दैना उडवली. पुढील ३ दिवसात मोठा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस पडला होता. आजही पावसाने हजेरी लावली. दिवस उजाडताच अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडला. दिवसभर ढगाळ हवामान होते. आकाशात ढगांची गर्दी झाली होती. सूर्यदर्शन झाले नाही. सायंकाळी ढगांचा गडगडाट करीत पुन्हा पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे एकच दैना उडाली. यामुळे घरी परतणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची, शासकीय कार्यालयात गेलेल्या लोकांची तसेच दुकाने बंद करून घरी परतणाऱ्या व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी मात्र सुखावला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात जोरदार कोसळणार

आगामी तीन-चार दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चारही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने आज केले आहे.